अमर काणे, झी मीडिया, नागपूर: Nagpur News : मानवाची उत्क्रांती आणि तत्सम विषयांबाबत कायम बोललं, लिहिलं गेलं. अभ्यासक्रम आणि विविध वृत्तांच्या, शोध आणि निरीक्षणांच्या धर्तीवर आपल्याला याबद्दलची माहितीसुद्धा मिळाली. कैक हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृती नेमक्या कशा होत्या या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत अनेकदा मिळालं आहे. अशाच एका संस्कृतीवरून नागपुरात पडदा उचलला गेला आहे.
नागपूर जिल्ह्यातील कोहळा गावानजिक महापाषाण संस्कृतीचे पुरावशेष सापडले आहेत. पिपरडोल टेकड्यांच्या परिसरातील जंगलात महापाषाण संस्कृतीतील शंभराहून जास्त शिलावर्तुळं (दफनस्मारके) आणि प्राचीन वसाहत स्थळ आढळून आले आहे. पुरातत्त्व संशोधक डॉक्टर मनोहर नरांजे यांनी हा शोध लावला आहे. महापाषाण संस्कृतीचे लोहयुगातील हे पुरातत्त्व अवशेष तब्बल अडीच ते पावणे तीन हजार वर्ष पूर्वीचे आहेत. (Nagpur News aprox 3000 years old remains of megalithic culture found )
'झी 24 तास'च्या टीमनेही या पुरातत्व अवशेषांचे वास्तव आणि महत्व प्रत्यक्ष जंगलात जाऊन जाणून घेतले.हे पुरावशेष महापाषाण संस्कृती ही पाषाणयुगीन संस्कृती नव्हे तर ती लोहयुगीन संस्कृती होती.
डॉक्टर मनोहर नरांजे यांना कोहळा गावानजीच्या झुडपी जंगलात अशी शंभरावर शिळावर्तुळे शिळावर्तुळ प्रकारची दफन स्थाने आढळून आली. महापाषाण संस्कृतीचे लोक हे विदर्भाचे आद्यनिवासी होत त्यांनीच शेतीची सुरुवात विदर्भात सर्वप्रथम केली असावी असे या पुरावशेषांवरून दिसत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर नरांजे यांनी यावेळी झी 24 तासशी बोलताना सांगितले. या लोकांना लोखंडाचा उपयोग माहित होता एवढेच नव्हे तर लोहमृतिकेपासून लोह गाळण्याची कलाही त्यांना अवगत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाचं म्हणजे पूर्व (Vidarbha) विदर्भातील खास करून उमरेड आणि आजूबाजूच्या परिसरातील खनिज संपत्तीचे ज्ञान अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीच तिथे वसाहत करून राहत असलेल्या मानवाला माहीत असल्याचेही यावरून स्पष्ट होत आहे.या संस्कृतीच्या अनेक शिळावर्तुळ प्रकारच्या दफन स्थानांचे उत्खनन झालेले असून त्यातून विपुल प्रमाणात पुरावे प्रकाशात आलेले आहेत. मृताशी संबंधित वस्तू त्याची अवजारे, मातीची भांडी व इतर मृत व्यक्तीशी संबंधित वस्तू अथवा प्राणी सुद्धा पुरत असत. या शिळावर्तुळांच्या निर्मितीसाठी स्थानिक परिसरात उपलब्ध असलेला काळा पाषाण वापरलेला आहे.
इथं काही शिळावर्तुळे आकाराने लहान तर काही विशाल आहे. येथील शिळा वर्तुळाचा व्यास सुमारे पाच मीटर ते पंधरा मीटर असा आढळून येतो. वर्तुळाकार शिळांच्या मध्ये दगड गोट्यांचा भराव बहुतेक सर्वच शिळावर्तुळांमध्ये आढळून येतो पण, काही वर्तुळांमध्ये तो बाह्य कारणांमुळे नष्ट झालेला आहे. शिळावर्तुळांसाठी वापरलेली जागा ही कृषी कार्यासाठी उपयुक्त नसून ती डोंगराळ व जंगला लगत आहे. कृषी योग्य भूमी दफन स्थानासाठी वापरली जाऊ नये असा विचार यामागे असणे संभाव्य आहे.
कोहळा परिसरातील शिळावर्तुळांची विपुल संख्या लक्षात घेता येथे बऱ्याच मोठ्या संख्येत महापाषायुगीन लोक दीर्घकाळ वास्तव्यास होते असा अंदाज आहे. कोहळा गावानजीक सापडलेल्या या महापाषाण संस्कृतीच्या अवशेषांबाबत पुरातत्व विभागाकडून सखोल संशोधन होणे गरजेचे आहे तशी मागणीही होत आहे.