वाल्मीक जोशी, झी मीडिया, जळगाव : एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी गेले तीन महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. पण या संपाचा ग्रामीण जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: शाळकरी मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कोरोनाकाळानंतर शाळा, महाविद्यालयं सुरु झाली. पण ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांचा प्रवास हा एसटीवर अवलंबून असतो. एसटीच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
गाव खेड्यातील मुलांना शाळा- कॉलेजमध्ये जाताना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. एसटी बंद असल्याने मिळेल त्या वाहनातून गर्दीत शाळा गाठावी लागतेय.
जळगावच्या बोदवडमधल्या शेलवड गावातली तृप्ती चौधरी नावाची विद्यार्थिनीही असाच रिक्षातून प्रवास करत होती. रिक्षात अनेकजण कोंबली असल्याने तृत्पीचा तोल जाऊन तिच्या मेंदुला दुखापत झाली. उपचारासाठी नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला.
एसटी बस सुरू असती तर कदाचित तृप्तीचा जीव गेला नसता अशी प्रतिक्रिया तिच्या पालकांनी दिली आहे. बोदवड तालुक्याच्या विविध गावातून चार हजारावर विद्यार्थी एसटीतून अप-डाऊन करायचे मात्र आता या सगळ्यांना अशाप्रकारे जीवघेणा प्रवास करावा लागतोय.
विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेक खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त किंवा चालकाच्या दोन्ही बाजूला बसवून वाहनं चालवतात. अशाच पद्धतीनेप्रवास करणं तृत्पी चौधरीच्या जीवावर बेतलं.