मंदिरात नारळ फोडला आणि झाली ही शिक्षा

त्याच्या चुकीची शिक्षा कुटुंबाला भोगावी लागली. संपूर्ण पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशी ही लाजीरवाणी घटना घडलीय लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात.

Updated: Feb 5, 2022, 12:12 PM IST
मंदिरात नारळ फोडला आणि झाली ही शिक्षा  title=

शशिकांत पाटील, झी मीडिया - त्याची फक्त एकच चूक झाली कि त्यानं मंदिरात जाऊन नारळ फोडला. पण, त्याच्या या चुकीची शिक्षा कुटुंबाला भोगावी लागली. संपूर्ण पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशी ही लाजीरवाणी घटना घडलीय लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात.        

अगदी दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या सावंगी मग्रापूर गावाच्या उपसरपंचाने दलितांचा पाणीपुरवठा बंद केला होता. 28 दिवसांपासून हे दलित ग्रामस्थ पाण्यासाठी तडफडत होते. पाणी पुरवठाच होत नसल्याने या दलित कुटुंबीयांनी गाव सोडून गाववेशीवर ठिय्या मांडला होता.

ही घटना घडून काही तास होत नाही तोच पुन्हा एकदा दलित कुटुंबावर बहिष्कार घालण्याची घटना समोर आलीय. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात एक दलित तरुणानं मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरात नारळ फोडले. त्यामुळे येथल्या ग्रामस्थांनी त्या दलित कुटुंबाला आपले लक्ष्य केलंय.

त्या तरुणानं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. दलितांनी मंदिरात जाऊन दर्शन घेऊ नये हा येथला नियम. पण त्यानं हा नियम मोडल्यानं गावकऱ्यांनी  कुटुंबासोबतचे सर्व व्यवहार बंद ठेवले. त्यांना दळण दळून दिले जात नव्हते, किराणा बंद, शेतातील मजूरीसाठी बोलवनं बंद अशा पद्धतीने बहिष्कार टाकण्यात आला होता.

गावातील कोणी बहिष्काराचा नियम मोडला तर त्यालाही तब्बल 50 हजारांचा दंड लावला जाणार होता. दोन दिवसांनी हे प्रकरण औराद शहाजनी पोलिसांना कळलं. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवलं. मात्र, बहिष्काराचं हे अस्त्र सर्वप्रथम कोणी उगारलं, कुणी पुढाकार घेतला याबाबतची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.

पोलिसांनी सामंजस्यानं हे प्रकरण मिटवलं असल्यानं अद्याप गुन्हा दाखल केला गेला नाही. मात्र,  शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारी आहे एवढं मात्र निश्चित.
 
त्या समाजकंटकांना रासुका लावा - सचिन खरात

ताडमुगळी गावात मंदिरात जाण्यावरून दलित बांधवांना वाळीत टाकून त्यांना कोणी मदत करेल त्याला 50 हजार रुपये दंड लावण्याचा प्रकार निषेधार्थ आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी करून अशा समाजकंटाकावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.