मुंबई : महाविकासआघाडी सरकारच्या काळात किराणा दुकान, मॉल आणि सुपरमार्केटमधून वाइन विक्रीचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाची अंमबलबजावणी होण्याआधीच याला विरोध होऊ लागला. त्यानंतर सरकारने याबाबत लोकांकडून हरकती मागवल्या होत्या. पण आता सरकार बदल्याने हा निर्णय रद्द होणार की पुन्हा लागू होणार याबाबत विचार सुरु आहे.
कोरोना काळात दारु, वाईन आणि बिअर विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे राज्य सरकारला मिळणारा महसूल कमी झाला होता. पण आता पुन्हा महसूल वाढला आहे. असं राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं आहे.
राज्याला मिळणाऱ्या महसूलापैकी सर्वाधिक महसूल देण्याच्या बाबतीत हा विभाग तिसऱ्या स्थानावर आहे. यातून राज्याला 17 हजार कोटीपेक्षा जास्त महसूल मिळतो.
राज्यातील जनतेकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्याची पडताळणी करुन सूपरमार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती ही त्यांनी दिली.
सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीबाबत अनेक संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारला एक पाऊल मागे यावं लागलं होतं. समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील या निर्णयाला विरोध केला होता.