मुंबई : मालमत्ता कर थकवणाऱ्या मुंबईकरांची आता खैर नाही. मुंबई मनपाने आता कारवाईला सुरूवात केली आहे. ३१ डिसेंबर २०२९ या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत २२८ मालमत्तांवर अटकावणीची प्रक्रिया कऱण्यात आली आहे. या २२८ मालमत्तांनी ५८१ कोटी ११ लाखांचा मालमत्ता कर थकवला आहे. मुंबई महापालिका आता अशा कर बुडव्य़ांना दणका देण्याच्या तयारीत आहेत.
कारवाईमुळं या मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर निर्बंध असणार आहेत. त्यानंतरच्या टप्प्यात मालमत्ता व्यवसायिक स्वरुपाची असल्यास जलजोडणी खंडीत करण्याची कारवाई केली जाते. त्यानंरच्या टप्प्यामध्ये मालमत्ता अटकावणीची किंवा जप्तीची कारवाई केली जाते. त्यानंतरही कराचा भरणा न केल्यास मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येते.
महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांना मालमत्ता विषयक कराची देयके प्राप्त झाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर जमा करणे आवश्यक आहे. जे मालमत्ता धारक मुदतीत कर भरत नाहीत, त्यांच्यावर टप्पेनिहाय कारवाई सुरु करण्यात येते.
याआधी जकात कर हा मुंबई महापालिकेला महसूल देत होता. पण २०१७ पासून जकात बंद झाल्य़ामुळे महापालिकेला मालमत्ता करावर अवलंबून राहावं लागत आहे.