#FacebookDown: फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प झाल्याने नेटकऱ्यांचा जीव कासावीस

सकाळपासून फेसबुकवरील अपडेटस, नोटफिकेशन आणि पोस्टस बघता येत नसल्याने अनेकांची चांगलीच गोची झाली आहे.

Updated: Mar 14, 2019, 09:07 AM IST
#FacebookDown: फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प झाल्याने नेटकऱ्यांचा जीव कासावीस title=

मुंबई: सोशल मीडियावरील लोकप्रिय व्यासपीठ असलेल्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामची ठप्प असलेली सेवा आता पूर्ववत झाली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. काल रात्रीपासूनच युजर्सना फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या वापरात अडथळे येत होते.  फेसबुक उघडल्यावर "Facebook is down for required maintenance right now, but you should be able to get back on within a few minutes." असा मेसेज स्क्रीनवर दिसत होता. दुसरीकडे इन्स्टाग्रामच्या वापरातही अशाच तांत्रिक अडचणी येत होत्या. अनेक यूजर्सनी फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प झाल्याचा स्क्रिन शॉट काढून ट्विटरवर शेअर केले होते.

डेस्कटॉप आणि मोबाईल दोन्ही व्हर्जन्समधील फेसबुकचा वापर करताना अडचणी येत होते. यामध्ये प्रामुख्याने युजर्सना फेसबुकवर पोस्ट अपलोड करता येत नव्हती. तसेच फेसबुक पेज अपडेट आणि लोड होण्यासाठी अडथळा येत होता. जनरेशन नेक्स्टसाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम म्हणजे मुलभूत गरज मानली जाते. मात्र, आज सकाळपासून फेसबुकवरील अपडेटस, नोटफिकेशन आणि पोस्टस बघता येत नसल्याने अनेकांची चांगलीच गोची झाली आहे. साहजिकच सोशल मीडियाच्या इतर व्यासपीठांवर याचे पडसाद उमटले होते. काही वेळापूर्वी ट्विटरवर #FacebookDown हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता. 

काल रात्रीपासून फेसबुकच्या वापरात अडथळे येत असल्याची माहिती आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन, सिएटल भाग, लॅटिन अमेरिका, ब्रिटनमधल्या काही शहरांत या सेवेत अडचणी येत होत्या. हा कुठलाही सायबर हल्ला नसल्याचे फेसबुककडून स्पष्ट करण्यात आले. दुरुस्तीसाठी फेसबुक बंद असून सेवा लवकरच पूर्ववत होईल असा संदेश झळकत होता.  गेल्या वर्षी सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये देखील फेसबुक काही काळ बंद पडल्याची घटना घडली होती. तत्पूर्वी बुधवारी गुगलची सेवाही अशाचप्रकारे ठप्प झाली होती. त्यामुळे गुगल ड्राइव्ह, जीमेल आणि यू-ट्यूब या प्रमुख सेवांच्या वापरात अडथळे निर्माण झाले होते.