मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे म्हणजेच श्रीधर पाटणकर यांच्या ६ कोटींहून अधिकच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) टाच आणली. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. थेट उद्धव ठाकरे यांच्या कुटूंबियांवर कारवाई केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याप्रकरणावर बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड म्हटले की, मी आता माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही. आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाले आहे.
सक्तवसुली संचालनालयाने काल श्रीधर पाटणकर यांचे ठाण्यातील नीलांबर प्रकल्पातील 11 फ्लॅट्स जप्त केल्याची कारवाई केली आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. या कारवाया म्हणजेच केंद्र सरकार राज्यातीली महाविकासआघाडीवर सूडबुद्धीने वागत असल्याचा सूर मविआ नेत्यांना लावला आहे.
''राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी अशापद्धतीचा वापर करणं हे द्वेषाचं उदाहरण आहे. हे योग्य नाही. तुम्ही आम्हाला जेवढे डिवचाल तेवढे आम्ही घट्ट होऊ. महाराष्ट्राची जनता सगळं उघड्या डोळ्यांनी हे पाहत आहे.
लोकशाहीमध्ये असा कायदा करायचा की, ज्याचा जामिनच होऊ शकत नाही. जामिन हा नागरिकाचा अधिकार आहे.
असं सूडाचं राजकारण महाराष्ट्राने कधीही पाहिलं नाही. जे चाललंय ते उघडं डोळ्याने पाहत राहायचं. परंतू यात बायका-मुले अडकणार नाहीत याची काळजी घ्यायची, त्यांना लांब कुठेतरी ठेवायचं. महाराष्ट्रात राजकारण करायचं असे दिवस आता आले आहेत. असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
''राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. राज्य सरकारने काही नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, पण कोणाला तुरूंगात डांबलेलं नाही. आता आज झालेल्या कारवाईनंतर अशा गोष्टींवर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल हे नक्की. पण माझं मत सांगायचं तर आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही", असं सूचक वक्तव्य आव्हाड यांनी केलं आहे.