Marathi Bhasha Din : महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या जन्मदिनानित्ताने दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या निमित्ताने विधानभवनात 'कुसुमाग्रजांचा साहित्य जागर' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी प्रत्येकाने एक स्वरचित कविता सादर करावी, अशी अपेक्षा प्रत्येकाकडे व्यक्त केली. त्यावेळी व्यासपीठावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक कविता (Poem) स्वतः शब्दबद्ध केली आणि ती आपल्या भाषणाच्या शेवटी सादर केली.
आपण आपलीच एक कविता सादर करावी असं मला वाटलं, म्हणून मी माननीय रामदास आठवले यांच्याकडून प्रेरणा घेऊन बसल्या बसल्या चार ओळी लिहिल्या, तेवढ्या वाचतो असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आपली कविता सादर केली.
तुमची आमची माय मराठी
या मातेच्या गौरवासाठी
साहित्याची भरुया घागर
भावनेचा जेथे सागर
कुसुमाग्रजांचा हा साहित्य जागर
शब्द खजिना जरी रिती झोळी
मराठीला समर्पित माझ्या ओळी
आपले नाते जशा रेशीम गाठी
गर्वाने म्हणू या...
होय मी मराठी, होय मी मराठी...
म्हणून साजरा केला जातो 'मराठी भाषा गौरव दिन'
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात कवी कुसुमाग्रज यांचं मोलाचं योगदान आहे. मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी कुसुमाग्रज यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन आणि आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून 27 फेब्रुवारीला 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो. 21 जानेवारी 2013 मध्ये याचा शासन निर्णय घेण्यात आला.
'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी भाषा दिवस' यात अनेकवेळा गफलत केली जाते. मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. तर 1 मे रोजी मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मराठी भाषिकांचं राज्य 1 मे हा दिवस 1965 पासून मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. वसंतराव नाईक सरकारने याची घोषणा केली होती.