Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election 2024) अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरीही राज्यात विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सत्ताधारी त्यांचं संख्याबळ वाढवण्यावर भर देतानाच केंद्रीय सूत्रधारांकडून फोडाफोडीचं राजकारण केलं जात असल्याचा विरोधकांचा आरोप होत आहे, तर तिथं काही नेते या सत्ताकारणामध्ये स्वत:ची ठाम भूमिका मांडण्याच्या प्रयत्नांच सत्ताधारी आणि विरोधकांच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. ही नाराजी नेमकी कशामुळं, त्यामागे कोणी व्यक्ती कारणीभूत आहे की परिस्थिती? या सर्वच गोष्टी येत्या काळात स्पष्ट होणार आहेत.
दरम्यान, सध्या अनेक चर्चांना वाव मिळू शकतो कारण ठरेल ते म्हणजे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं एक सूचक विधान. काँग्रेसने वंचितला सोबत घेतलं असतं तर आज राहुल गांधी पंतप्रधान असले असते असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत आंबेडकरांनी हा दावा केलाय.
'काँग्रेसने वंचितला सोबत घेतलं असतं तर भाजपला रोखता आलं असतं. वंचित आणि काँग्रेसने मिळून भाजपला 220 जागांच्या वर जाऊ दिलं नसतं', असंही आंबेडकर म्हणाले. तसंच जर भाजपच्या 20 जागा कमी झाल्या असत्या, तर मोदी पंतप्रधान झाले नसते; राहुल गांधी पंतप्रधान झाले असते असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला. वंचितला न घेतल्याने काँग्रेसने पंतप्रधानपदाची संधी गमावली असं ठाम मत त्यांनी मांडलं.
अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य करणाऱ्या प्रकाश आंबेडकर आंनी यावेळी जरांगे आणि निवडणुका यांवरही वक्तव्य केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन आणि उपोषण करत समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या जरांगे यांच्याविषयीसुद्धा त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. 'मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली पाहिजे. जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर हे आंदोलन शरद पवारांनीच चालवलं आहे असा निष्कर्ष लोक काढतील', असा मोठा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. 'टू द पॉईंट' मुलाखतीत प्रकाश आंबेडकर आणखी नेमकं काय म्हणाले हे शनिवारी रात्री ९ वाजता झी २४ तासवर पाहता येणार आहे.