48 तासांत भूमिका स्पष्ट करतो म्हणणाऱ्या अशोक चव्हाणांचा आजच होणार भाजप प्रवेश

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Updated: Feb 13, 2024, 08:49 AM IST
48 तासांत भूमिका स्पष्ट करतो म्हणणाऱ्या अशोक चव्हाणांचा आजच होणार भाजप प्रवेश title=

Ashok Chavan BJP : महाराष्ट्रात काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून गळती सुरु आहे. माजी खासदार मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला मोठं भगदाड पडलं आहे. काँग्रेस नेते चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यासोबतच चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

'मी दिनांक 12/02/2024 च्या मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे,' असे पत्र अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना पाठवले होते. त्यावर माजी विधानसभा सदस्य असेही लिहिलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर 'भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे,' अशी पोस्ट अशोक चव्हाण यांनी केली. त्यानंतर अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आज अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा माझा निर्णय पूर्णत: वैयक्तिक आहे. कुठल्याही आमदाराशी मी याबाबत चर्चादेखील केलेली नाही. अन्य कोण काय निर्णय घेणार हे मला माहिती नाही. मी कोणाशीही संपर्क साधलेला नाही. पक्षाने मला खूप काही दिले आणि मी देखील मनापासून अनेक वर्षे पक्षाची सेवा केली आहे. येत्या दोन दिवसात राजकीय दिशा ठरवेन. मला काही अवधी लागेल. पण दोन दिवसात जाहीर करेन. भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतला नाही. पण दोन दिवसात माझी राजकीय भूमिका जाहिर केलीय, असे अशोक चव्हाण यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची प्रतिक्रिया

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. "अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबद्दल तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. आगे आगे देखो होता है क्या," असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.