Mhada : गिरणी कामगारांच्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांचं लक्षवेधी वक्तव्य, आताच पाहा

Mhada Mumbai Lottery 2023 :  म्हाडाने काढलेल्या लॉटरीतील विजेत्या अशा गिरणी कामगारांना दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळणार आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Jun 16, 2023, 09:30 AM IST
Mhada : गिरणी कामगारांच्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांचं लक्षवेधी वक्तव्य, आताच पाहा   title=
Mhada Mumbai Lottery 2023

Mhada Mumbai Lottery 2023 in Marathi: म्हाडाकडून गिरणी कामगारांसाठी (MHADA House) 2020 मध्ये घरांची लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीत गिरणी कामगार (mill workers) आणि त्यांच्या वारसदारांना या लॉटरीत घरे मिळाली होती. याचदरम्यान गिरणी कामगारांसाठी खुशखबर असून म्हाडाच्या (Mhada) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 2020 मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सदनिकांच्या चाव्यांचे वाटप मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 

गिरणी कामगारांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप

सह्याद्री अतिथीगृह येथे म्हाडाच्या (Mhada) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन 2020 मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सदनिका सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील पात्र व सदनिकेच्या विक्री किंमतीचा व मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या पात्र 162 यशस्वी गिरणी कामगार/वारस यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदनिकांच्या चाव्या व वितरणपत्र वाटप करण्यात आले. 

गिरणी कामगारांना घरे मिळणार..

गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान असून अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना (mill workers) शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केले. तसेच आजचा दिवस आमच्या आयुष्यातला महत्त्वाचा असून गेली अनेक वर्षे गिरणी कामगारांना घरे मिळणार अशी फक्त चर्चा होत होती. आज मात्र प्रत्यक्षात गिरणी कामगारांना घरांच्या चाव्यांचे वाटप झाले.  गिरणी कामगारांना प्रत्यक्ष चाव्या आणि पत्र दिले जात आहेत. 

सन 2020 मधील गिरणी कामगार सोडतीतील उर्वरित सुमारे 3500 यशस्वी गिरणी कामगार/वारस यांना येत्या 3 महिन्यांत सदनिकांचा ताबा देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. सदनिकेच्या चाव्या मिळत असलेल्या गिरणी कामगारांना सदनिका विक्री किंमतीचा भरणा उशिरा केल्याबद्दल लावलेला दंड माफ करून 1 जुलै 2023 पासून सदनिकेसाठीचा देखभाल- दुरुस्ती खर्च आकारण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. 

कायदे हे सर्वसामान्यांसाठी असावेत, ही शासनाची भूमिका असून योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना शासनाकडे येण्याची वेळ येवू नये, यासाठी 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम राबवित आहोत. आतापर्यंत या शासनाने सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. गिरणी कामगारांना सदनिका खरेदी करण्यासाठी मुंबई बँकेने कर्ज दिल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी बँकेचेही आभार मानले.

162 यशस्वी गिरणी कामगार यांची पात्रता निश्चित 

याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गिरणी कामगारांची सन 2020 मध्ये सोडत काढण्यात आली. मात्र आत्तापर्यंत केवळ 26 यशस्वी गिरणी कामगार/वारस यांची पात्रता निश्चित होऊन विक्री किंमतीचा भरणा केलेला होता. सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार/वारस यांच्या पात्रतेविषयक कामाला गती मिळून त्यांना सदनिकेचा लवकरात लवकर ताबा मिळावा, यासाठी आमदार सुनील राणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती तयार केली. समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे कमी कालावधीत जवळपास 162 यशस्वी गिरणी कामगार/वारस यांची पात्रता निश्चित झाली.

येत्या तीन महिन्यात उर्वरित सुमारे 3500 गिरणी कामगार/ वारस यांची पात्रता पूर्ण करुन त्यांना सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन श्री.फडणवीस यांनी दिले. गिरणी कामगारांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात घरे देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ज्या गिरणी कामगार/वारसांची पात्रता निश्चित होत नाही ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येऊन इतरही गिरणी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेवटच्या पात्र कामगाराला सदनिकेचा ताबा मिळत नाही तोपर्यंत हे काम सुरु राहील. सदनिका मिळण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व 1 लाख 50 हजार गिरणी कामगारांना घर उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे लवकरच एक मोहीम सुरू करण्यात येणार असून विशेष कक्ष स्थापन केला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.