Mumbai new Jogeshwari Terminus: मुंबईतून देशातील विविध भागात व राज्यातील जिल्ह्यांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. सध्या दादर, वांद्रे, सीएसएमटी आणि कुर्ला एलटीटी येथून मेल आणि एक्स्प्रेस गाड्या सुटतात. मात्र लवकरच मुंबईकरांच्या सेवेत नवीन टर्मिनस येत आहे. ऑक्टोबरअखेरीस हे टर्मिनस प्रवाशांसाठी खुलं होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान बांधले जात आहे. या टर्मिनसचे नावदेखील जोगेश्वरी टर्मिनस असं असणार आहे.
जोगेश्वरी टर्मिनसचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. एकदा का हे टर्मिनस सुरू झाले तर मुंबईच्या उपनगरातील प्रवाशांसाठी अतिरिक्त मेल आणि एक्स्प्रेस गाड्या धावणार आहेत. पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी टर्मिनसच्या कामाला वेग आलेला असून या ठिकाणी आयलंड पॅसेंजर प्लॅटफॉर्म बांधला जात आहे. या प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूला ट्रेन उभी राहणार आहे. भविष्यात आणखी एक प्लॅटफॉर्म वाढविणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या टर्मिनसवर तीन मार्गिका असून त्यावरून केवळ मेल / एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत.
जोगेश्वरी टर्मिनसवरून १२ अतिरिक्त एक्स्प्रेस गाड्या भारतातील विविध भागांमध्ये धावणार आहेत. प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी टर्मिनसला राममंदिर स्थानकाशी जोडण्यात येणार आहे. यासाठी फूटओव्हर ब्रिजचे बांधकाम करण्यात येणार आहे. बेट आणि होम प्रकारचे एकूण 2 प्लॅटफॉर्म आणि 3 मार्गिका या नव्या टर्मिनसमध्ये असणार आहे. दोन मजली सेवा इमारती आणि पाच मजली स्टेशन इमारत असणार आहे.
या टर्मिनसच्या बांधकामासाठी ७६.४८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एस्कलेटर बसवले जाणार नसले तरी प्रवाशांसाठी लिफ्ट आणि वेटिंग लाउंजची सुविधा असणार आहे. टर्मिनसच्या परिसरातील रस्त्यांचा विकास आणि पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जोगेश्वर टर्मिनसला मेट्रो मार्ग 7, मेट्रो मार्ग 2 अ आणि मेट्रो मार्ग 6 च्या प्रवाशांना लांब पल्ल्याच्या ट्रेनपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. राम मंदिर रेल्वे स्थानक आणि जोगेश्वरी टर्मिनस यांच्यामधील अंतर सुमारे 500 मीटर आहे.