मुंबई : Sharad Pawar first reaction on Nawab Malik ED Inquiry : राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मलिक हे भाजपविरोधात बोलत आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे, असे पवार म्हणाले. (Nawab Malik ED Inquiry, NCP president Sharad Pawar has given the first reaction)
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांची ईडी चौकशी सुरु आहे. आज सकाळी साडे सहा वाजता नवाब मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले. त्यानंतर मलिकांना ईडीच्या ऑफिसमध्ये हजर राहण्यास सांगितले. मलिक सकाळी साडे सात वाजता ईडी ऑफिसमध्ये चौकशीसाठी पोहोचले. मनी लाँड्रिंग प्रकरणी मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकरने ईडीची चौकशी केल्यानंतर मलिकांना समन्स बजावल्याचं बोललं जात आहे. मलिकांचं आणि अंडरवर्ल्डचं कनेक्शन आहे का? याबाबत चौकशी असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
मलिकांच्या कारवाईवर शरद पवार पुढे म्हणाले, सत्य बोलणाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे. भाजपाविरोधात बोलत आहेत. त्यामुळे मलिकांवर कारवाई होणार याची खात्री होती. ती खरी ठरत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय वापर होत आहे. असे पुरावे नसताना आरोप या आधीही केले. माझ्या विरोधात ही अनेक वर्ष आधी आरोप झाले पण पुरावे नाही दाखवू शकले. मलिक हे भाजपविरोधात बोलत आहेत म्हणून ही कारवाई करण्यात येत आहे.
तसेच मलिकांवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मलिकांना आधी काही नोटीस आली नव्हती, त्यामुळे काही चिंता वाटत नाही. सत्य बोलत असल्याने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
दरम्यान भाजपा व्यतिरिक्त सर्व पक्षासाठी ईडी आहे का असा सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप नेत्यांची आम्ही सगळी प्रकरणे ईडीकडे देणार आहोत, असे ते म्हणाले. 2024 नंतर आम्ही सुध्दा तुमच्या मागे अशा तपास यंत्रणा लावू, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.