No Exam During Ganapati Festival: गणपतीच्या सुट्टीत अनेक विद्यार्थी गावी जात असतात. अशावेळी सुट्टी दरम्यान किंवा लगेचच शाळांच्या परीक्षा असल्या तर विद्यार्थ्यांची मोठी अडचण होते. पण आता या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. कारण गणेशोत्सव काळात कोणत्या परीक्षा घेऊ नका असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनांना दिले आहेत. युवासेनेकडून शिक्षण विभागाला यासंदर्भात निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्यात मंगळवार 19 सप्टेंबर २०२३ ते गुरुवार 28 सप्टेंबर 2023 पर्यंत गणेशोत्सव साजरा होत आहे. या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नयेत असे लेखी निर्देश शाळांना लवकरच देण्यात येणार आहेत. युवासेनेचे माजी व्यवस्थापन परीषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी शिक्षणाधिकारी राजु तडवी यांना निवेदन देऊन यासंदर्भात मागणी केली होती.
सगळीकडे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो पण काही कॉन्व्हेन्ट शाळा जाणुन बुजून या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या लेखी,तोंडी अथवा प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात. मुंबईतील कोकणवासीय या कालावधीत आपल्या कुटुंबासह मुळगावी जात असतात. अशावेळी शाळांना पाच दिवसांची सुट्टी दिली जाते. पण परतीच्या प्रवासात दळणवळण साधनांची कमी, अत्यंत वाईट रस्ते असल्यामुळे त्या कालावधीत परतणे शक्य होत नाही. यामुळे गणेशोत्सव कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नयेत असे निवेदन युवासेनेने दिल्याची माहिती प्रदीप सावंत यांनी दिली.
त्यावर कार्यवाहीचे निर्देश देऊन परीक्षा न घेण्याचे आदेश देण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि शिक्षण उपसंचालक संदिप संगवे यांनादेखील यासंदर्भा ई मेल व्दारे निवेदन पाठवण्यात आले आहेत. तसेच त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. उप संचालक कार्यालयातून देखील गणेशोत्सव काळात परीक्षा घेतली जाणार नाही असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती युवासेनेकडून देण्यात आली.