मुंबई : २९ ऑगस्टच्या पावसातील पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून मदत मिळणार आहे. मुंबई, ठाणे परिसरात २९ ऑगस्टला तुफान पाऊस झाला होता. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
मुंबई आणि ठाण्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. मुंबई आणि ठाण्यातील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत मागणी केली. शिंदे यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत पूरग्रस्तांना जास्त नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी मान्य केलं. २९ ऑगस्टला झालेल्या पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील जनजीवन ठप्प झाले होते.
रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचाही बोजवारा उडाला होता. अनेक भागात गुडघाभर पाणी साचल्याने अनेकांचे मोठं नुकसान झालं होतं. आता मुंबई, ठाण्यातील याच नुकसानग्रस्तांना राज्य सरकार नुकसान भरपाई देणार असल्याचे जाहीर करण्यात आलंय.