"केंद्रीय तपास यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागतात"; उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका

ईडीने संजय राऊत यांना विनाकारण अटक केल्याचे म्हणत कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला

Updated: Nov 10, 2022, 02:15 PM IST
"केंद्रीय तपास यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागतात"; उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका title=

मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी (patra chawl scam) 100 दिवसांहून अधिक वेळ कारागृहात असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विशेष न्यायालयाने (PMLA Court) बुधवारी जामीन मंजूर केला. या प्रकरणात संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना विनाकरण अटक करण्यात आली. ही अटक बेकायदा असल्याचे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी निकालपत्रात नमूद केले. यानंतर संजय राऊत कारागृहातून बाहेर आले आहेत. यानंतर आता संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्री येथे जाऊन भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केलीय.

"संजय राऊत यांच्या धाडसाचं कौतुक आहे. संजय राऊत माझे जिवलग मित्र आहेत. मित्र तोच असतो जो संकटाच्या काळात लढत असतो. काल न्यायालयाने जो निकाल दिला त्यामुळे न्यायदेवतेचे आभार मानतो. कालच्या निकालपत्रात न्यायालयाने अत्यंत परखड निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे आता जगजाहीर झालंय की केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकराच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. ज्याच्या अंगावर जा म्हटलं त्याच्या अंगावर जात आहेत. हे संपूर्ण जग पाहत आहे. न्यायदेवता सु्द्दा केंद्र सरकार अंकित करण्याची प्रयत्न गेल्या आठ दिवसात दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी न्यायवृदांवरच शंका उपस्थित केली आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

"न्यायालयाला आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असेल तर देशातल्या जनतेने त्याचा विरोध केला पाहिजे. न्यायदेवतेवर भाष्य करणे गुन्हा आहे आणि त्यावर केंद्रीय मंत्रीच भाष्य करत आहेत. आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन पक्ष फोडले गेले. खोटे गुन्हे दाखल केले गेले. काल न्यायलयाने केंद्र सरकारला दणका दिल्यानंतर कदाचित खोट्या केसमध्ये संजय राऊत यांना गुंतवण्याचा प्रयत्न होऊ शकेल. कारण एवढी लाज वाटण्यासारखी हे सरकार असतं तर अशा घटना घडल्या नसत्या," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

"जे घाबरून पक्षातून पळून गेले आहेत त्यांसाठी सुद्धा हा मोठा धडा आहे. न्यायालय निपक्षपातीपणे निर्णय देत आहे हे आपल्या देशासाठी खूप मोठं आणि चांगलं लक्षण आहे. काल आलेले निकालपत्र हे मार्गदर्शक म्हणून आचरणात आणायला हरकत नाही," असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.