काँग्रेसचे रचिटणीस राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे कार्यकारी अध्यक्षपद सोपविले जाण्याची शक्यता अधिक आहे. तशी जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय पटलावर सुरु आहे.
केंद्रातील पंतप्रधान मनमोहन सिंग सरकार भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये पुरते गुरफटले असतानाच साडेतेरा वर्षांपासून काँग्रेसचे नेतृत्व करीत असलेल्या सोनिया गांधी यांच्या आजारपणामुळे सरकार आणि काँग्रेस पक्षाची निर्णयक्षमता डळमळीत झाली आहे, अशा स्थितीत सात वर्षांपासून सक्रिय राजकारणात असलेल्या ४२ वर्षीय राहुल गांधी यांचे नेतृत्व पुढे आणून मरगळलेल्या काँग्रेसमध्ये जोश निर्माण करण्याचा हेतू या बदलामागे असल्याचे बोलले जाते.
अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या चर्चेने सध्या चांगलाच जोर धरला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते याविषयी कुठलेही भाष्य करण्यास नकार देत आहेत. मात्र, इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर १९ नोव्हेंबर रोजी राहुल गांधींकडे कार्यकारी अध्यक्षपदाची सोपविली जाण्याची शक्यता आहे.