मुंबई: चांगल्या तब्येतीसाठी जीममध्ये अनेक जण व्यायाम करतात. पण जीममध्ये वापरण्यात येणाऱ्या साधनांचे फायदे सगळ्यांना माहिती असतात असं नाही.
डंम्बेल्स, एक्सरसाईज बाईक, ट्रेडमिल, स्टेपर, अपर बॉडी आणि कायनेसिस स्टेशन ही जीममध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्यांबाबतच्या सगळ्याच गोष्टी आणि त्याचे फायदे तुम्हाला माहिती असतीलच असं नाही. ही साधनं फक्त तुमच्या मांसपेशींनाच मजबूत करत नाहीत, तर याचे आणखी बरेच फायदे आहेत.
ट्रेडमिलवर पळण्याचा व्यायाम केल्यामुळे स्टॅमिना तर वाढतोच पण हृदयाची गतीही चांगली होते. ट्रेडमिलवर व्यायाम केल्यामुळे स्मरणशक्तीही सुधारते. पण ट्रेडमिलवर सलग 45 मिनीटं जॉगिंग करण्यापेक्षा 10 मिनीटं वॉर्म अप, त्यानंतर 20 मिनीटांमध्ये 2 मिनीट जॉगिंग आणि एक मिनीट जोरात पळालं पाहिजे. असा व्यायाम केल्यामुळे तुमच्या 500 ते 600 कॅलरीज कमी होतील.
रोव्हर एक उत्तम कार्डियो मशिन आहे. रोईंग वर्कआऊटमुळे पूर्ण शरिराचा व्यायाम होतो. यामध्ये एकाच वेळी दोन्ही हात आणि पायांचा व्यायाम होतो. हृदयातल्या मांसपेशी मजबूत होतात, आणि कॅलरीज कमी व्हायला मदत होते.
खांदे मजबूत करण्यासाठी पुश-अप्सपेक्षा डंम्बेल्स जास्त उपयोगी ठरतात. डंम्बेल्समुळे मांसपेशींना आकार यायला सुरुवात होते.
रेझिस्टंट्स बँडनं वेट ट्रेनिंग केलं तर मांसपेशी मजबूत व्हायला मदत होते. पण जीममध्ये जाणारे बरेच जण याकडे दुर्लक्ष करतात. रेझिस्टंट्स बँडमुळे पूर्ण शरिराचा व्यायाम होतो. कार्डियो वर्कआऊटआधी 15 ते 18 सेट रेझिस्टंट्स बँडबरोबर व्यायाम करावा, असा सल्ला एक्सपर्ट देतात
जीममध्ये व्यायाम करताना अनेक जण छोट्या गॅजेट्सची उपेक्षा करतात. स्विस बॉल, मेडिसिन बॉल, लॅडर, बोसू बॉल, बॅटल रोप यांनी व्यायाम केल्यामुळे संतुलन, गती वाढते. अर्धगोलाकार असलेला बोसू बॉल पुश अप्ससाठी चांगला आहे. शरिराच्या वरच्या भागातील मांसपेशीयामुळे प्रभावी होतात.
जमिनीवर पुश अप्स केल्यामुळे फक्त एकाच मांसपेशींना फायदा होतो. पण बोसूबॉलवर व्यायाम केल्यामुळे सगळ्या मांसपेशी सक्रीय होतात. बोसू बॉलवर व्यायाम केल्यामुळे जखमी व्हायची शक्यताही कमी होते.
व्यायामावेळी आलेल्या घामामुळे शरिरात असलेला बॅक्टेरिया दूर होतो. ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता कमी होते.
पायाच्या व्यायामासाठी स्ट्रेच पेक्षा फॉर्म रोलरचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. रोलरमध्ये एकाच वेळी अनेक मुव्हमेंट्सचा व्यायाम होतो. तसंच ज्या अवयवांचा व्यायाम होत नाही, त्याचाही रोलरमुळे व्यायाम होतो.