मुंबई : हल्ली तरुणाईमध्ये सेल्फीची क्रेझ इतकी वाढलीये की त्यापायी तरुणांना आपले जीव गमावावे लागतायत. दोन दिवसांपूर्वी वांद्रेच्या बँडस्टँडजवळील समुद्रात सेल्फीच्या नादात तीन तरुणी बुडाल्या. त्यातील दोन जणी वाचल्या. मात्र या दोघांना जीवदाना देणारा आणि तिसरी तरुणी यांना मात्र जीव गमवावा लागला.
अनेक तरुण-तरुणींना दिवसांतून कित्येक वेळा सेल्फी काढून त्या सोशल साईटवर पोस्ट करण्याची जणू सवयच लागलीये मात्र ही सवय कदाचित मानसिक आजाराची लक्षणेही असू शकतात. मनोवैज्ञानिकांच्या भाषेत याला सेल्फायटिस असे म्हटले जाते. जे. जे. रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सकाळला याबाबत ही माहिती दिली.
'दी अमेरिकन सायकायट्रिस असोसिएनश'च्या रिपोर्टनुसार दिवसातून किती वेळा सेल्फी काढला जातो यावर मानसिक आजाराचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
सेल्फायटिसची सुरुवात - ही व्यक्ती दिवसातून कमीत कमी तीनवेळा सेल्फी काढते मात्र त्यांना सोशल मीडियावर पोस्ट करत नाही.
तीव्र - या प्रकारातील व्यक्ती दिवसातून कमीत कमी तीन वेळा सेल्फी काढते आणि तिन्हीवेळा सोशल मीडियावर पोस्ट करते.
क्रोनिक सेल्फायटिस - यातील व्यक्ती दिवसभर सेल्फी काढत असतात आणि सोशल मीडियावर कमीत कमी ६ वेळा हे सेल्फी शेअर करतात.