www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
देशात जवळपास ४० बाँम्बस्फोटांच्या कटात सहभागी असलेला दहशतवादी अब्दुल करीम टुंडा दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झालीय. दाऊद इब्राहीम आणि बब्बर खालसाबाबत महत्वाची माहिती त्यानं दिलीये.
अब्दुल करीम टुंडा, हा भारतात अनेक दहशतवादी कारवायात माणसांचे बळी घेणारा नराधम. दाऊदचा हा खास हस्तक आणि खतरनाक दहशतवादी दिल्ली पोलिसांच्या अटकेत आहे. दिल्ली पोलीस आणि एनआयए त्याची कसून चौकशी करतायत. सुत्रांच्या माहितीनुसार टुंडाच्या चौकशीतून पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा टराटर फाटला आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. त्यात दाऊद आणि बब्बर खालसाबाबत अनेक माहिती समोर आलीय.
खुंखार दहशतवादी हाफीज सईद पाकव्याप्त काश्मिरच्या आतंकवादी शिबिरात अनेकवेळा आला होता. दाऊद इब्राहीमला आयएसआयची कडक सुरक्षा व्यवस्था असते. भारतावर जास्तीत जास्त हल्ले करण्यासाठी दाऊद इब्राहीम दहशतवाद्यांना चिथावणी देत असतो.
दाऊद इब्राहीम पाकिस्तानी सैन्याचा फॅन आहे. तसंच त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं काम पाकिस्तानी सैन्य करत असतं.
मुंबई दहशतवादी हल्ल्याची माहिती दाऊद आणि टुंडा या दोघांनाही होती. अमीर रझाशी टुंडाची अनेकवेळा भेट झाली. अमीर रझा पाकिस्तानातच राहतो. दाऊद इब्राहीम आणि हाफीज सईदची भेट टुंडानंच घडवली होती. दाऊदचा २६/११ हल्ल्यात हात नव्हता. मात्र दाऊदच्या आधी लखवीशी टुंडाची भेट झाली होती.
१५ ऑगस्टला नवी दिल्लीत स्फोट घडवण्याचा होता प्लॅन. बब्बर खालसाचा दहशतवादी रतनदीपसिंग १५ ऑगस्टला दिल्लीत स्फोट घडवून आणणार होता. रतनदीपसिंग दिल्ली किंवा त्याच परिसरात कुठंतरी लपला आहे, बब्बर खालसा आणि आयएसआय यांचे एकमेकांशी संबंध आहेत.
टुंडाकडून मिळालेल्या माहितीमुळं सुरक्षायंत्रणांना अनेक प्रकरणाच्या लिंक्स मिळणार आहेत. टुंडा आणि दाऊद यांच्या कुठे-कुठे आणि कधी भेटी झाल्या आहेत. याची माहितीही मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. लष्कर-ए-तोयबाच्या विविध नेटवर्कबाबतही त्यांच्याकडून माहिती मिळेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.