नवी दिल्ली : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं भरघोस मतांसह बहुमत मिळवलं... पण, आता सध्या घोडं अडलंय ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार कोण? या प्रश्नावर....
देशातील सर्वात मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर पक्षात खल सुरू आहे... यासाठी अनेकांची नावं चर्चेत आहेत... त्यात केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांचं नाव सर्वात पुढे आहे.
परंतु, राजनाथ सिंह मात्र उत्तरप्रदेशची खुर्ची सांभाळण्यासाठी उत्सुक नसल्याचं दिसतंय. मुख्यमंत्रीपदाबाबत राजनाथ सिंह यांना विचारलेल्या प्रश्नावर ते भलतेच भडकले. 'हा काय फालतूपणा आहे... या गोष्टी विनाकारण चर्चिल्या जात आहेत' असं म्हणत त्यांनी हा प्रश्न उडवून लावला.
Rajnath Singh says, "all these talks are futile & unnecessary" on question of his name being in the running for Uttar Pradesh CM pic.twitter.com/BB5oREKrIa
— ANI (@ANI_news) March 15, 2017
राजनाथ सिंह उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून लोकसभा खासदार आहेत. भाजपचे ते एक पहिल्या फळीतील नेते आहेत. परंतु, त्यांना मात्र राज्याच्या राजकारणात फारसा रस दिसत नाही.
दरम्यान, उत्तरप्रदेशचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून केशव प्रसाद मौर्य यांच्या नावावर गंभीरतेनं विचार केला जाऊ शकतो. त्यांनी मंगळवारी 14 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आपण या पदासाठी उत्सुक असल्याचंही दाखवून दिलं होतं.