टीम केजरीवालचं संसद मार्गावर आंदोलन

`इंडिया अगेंस्ट करप्शन`चे अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या समर्थकांची सुटका झाल्यानंतर त्यांनी संसद मार्गावर आंदोलन सुरू केलंय. केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर केजरीवाल ठाम आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 13, 2012, 06:52 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
`इंडिया अगेंस्ट करप्शन`चे अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या समर्थकांची सुटका झाल्यानंतर त्यांनी संसद मार्गावर आंदोलन सुरू केलंय. केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर केजरीवाल ठाम आहेत.
संसद मार्गावर जाऊन टीम केजरीवाल यांनी धरणं आंदोलन सुरू केलंय. याठिकाणी केजरीवाल समर्थकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. ही लढाई ‘करो या मरो’ची असल्याचं सांगत सलमान खुर्शीद राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असा इशारा केजरीवाल यांनी दिलाय. तर दुसरीकडे केजरीवाल राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल आणि समर्थकांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. केजरीवाल आणि समर्थकांना कालची रात्र राजीव गांधी स्टेडियममध्ये काढावी लागली होती. आज सुटका होताच अरविंद केंजरीवाल संसद मार्गाच्या दिशेनं रवाना झाले. याठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलय. केजरीवालांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समर्थकांनी मोठ्या संख्येनं संसद मार्गावर गर्दी केलीय.