चीनमध्येही फडकला तिरंगा

भारताच्या 70 व्या स्वतंत्रदिनादिनी भारताचे शेजारील राष्ट्र असलेल्या चीनमध्येही तिरंगा फडकावून हा दिवस साजरा केला.

Updated: Aug 16, 2017, 08:33 AM IST
चीनमध्येही फडकला तिरंगा title=

चिन्हुआ, चीन(शुभांगी पालवे, प्रतिनिधी) : भारताच्या 70 व्या स्वतंत्रदिनादिनी भारताचे शेजारील राष्ट्र असलेल्या चीनमध्येही तिरंगा फडकावून हा दिवस साजरा केला.

‘चिन्हुआ होमस्टे’ (Jinhua homestay) या उपक्रमासाठी वेगवेगळ्या देशांतून 45 सहभागी सध्या चीनमध्ये दाखल झालेत. ‘चिन्हुआ म्युनिपल पीपल्स गव्हर्नमेंट’तर्फे तब्बल 14 दिवसांचा हा कार्यक्रम राबवण्यात येतोय. उल्लेखनीय म्हणजे, या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैंकी तब्बल 20 जण भारतीय आहेत. 9 ऑगस्ट ते  23 ऑगस्टपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.   

भारताचा स्वातंत्र्यदिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे सहभागी सकाळी साडेसात वाजता(स्थानिक वेळेनुसार) एकत्र जमले होते. यावेळी राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. 

चिन्हुआ होमस्टे 

च्ययान (Zhiyan) या ऐतिहासिक वारसा असलेल्या गावाकडे पर्यटकांनी आकर्षित व्हावं आणि त्याचा फायदा इथल्या गावकऱ्यांना व्हावा, असा या उपक्रमाचा उद्देश. यासाठी सहभागींना आपल्या घराप्रमाणेच इथेही राहता यावं आणि पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी या उपक्रमाद्वारे सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आलेत. 

च्ययानची थोडक्यात ओळख

च्ययान हे च्यचियांग प्रांतातील लानशीमधलं एक छोटसं गाव. तसं पाहायला गेलं तर जगाची फारशी ओळख नसलेलं.. गावातील बहुतेक गावकरी जवळ असलेल्या शहरांत जाऊन आपल्या पोटापाण्याची सोय करतात. या गावातील रहिवाशांना सबळ बनवण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलंय. होमस्टे प्रोजेक्टच्या माध्यमातून पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोई-सुविधांसह सज्ज असलेली घरं उभारण्यात आलीत. अर्थातच याचा फायदा इथल्या गावकऱ्यांना होणार आहे. इथल्या पर्यटनाला वाव मिळण्याचा तसचं गावातील ऐतिहासिक स्थळं जपण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे. 

सांस्कृतिक देवाण - घेवाण

सांस्कृतिक देवाण –घेवाणीच्या दृष्टीनंही हा उपक्रम कौतुकास्पद ठरतोय. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांना आणि पर्यटकांना गावकऱ्यांशी संवाद साधणं सहज शक्य झालंय. भाषेची अडचण दूर करण्यासाठी चीनच्या विद्यापिठांतील काही विद्यार्थ्यांनाही यात सहभागी करून घेण्यात आलंय. त्यामुळे, विदयार्थ्यांसाठीही ही सांस्कृतिक पर्वणीच ठरलीय.       

चीनचे परदेश मंत्री भारतीय दौऱ्यावर

महत्त्वाचं म्हणजे, चीनचे परदेश मंत्री वांग सध्या तीन दिवसांच्या भारतीय दौऱ्यावर आहेत. नुकतीच त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांचीही भेट घेतलीय. त्यानिमित्तानं चीन-भारत संबंधांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय.