ओटावा (कॅनडा) : कॅनेडीयन विमान कंपनी बॉम्बडियातील एका वैज्ञानिकाने एका हायपरसॉनिक विमानाचे कंसेप्ट डिझाईन तयार केलंय. 'अँटिपोड' असं या कन्सेप्ट प्लेनचं नामकरण करण्यात आलंय.
या विमानाचा वेग इतका आहे की या विमानामुळे लंडन ते न्यूयॉर्क मधील अंतर फक्त ११ मिनिटांत कापणे शक्य होईल. म्हणजेच भारत आणि न्यू यॉर्कमधील अंतर केवळ अर्ध्या तासात कापणे शक्य होईल.
याच वैज्ञानिकाने यापूर्वीही असेच एक कंसेप्ट विमान तयार केले होते जे १० मॅकच्या वेगाने उड्डाण करू शकते. एक मॅकचा वेग म्हणजे ११९५ किमी/तास. हा वेग ध्वनीच्या वेगाइतका आहे.
'अँटिपोड' या विमानात दहा प्रवाशांना बसण्याची सोय असेल आणि ते दोन मॅकच्या वेगाने जाईल. म्हणजेच ते आवाजाच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने जाईल.
व्यापार आणि युद्ध क्षेत्रात हे विमान फार उपयुक्त ठरू शकते. हे विमान ४० हजार फूटांच्या उंचीवरुन उडू शकेल. याच्या पंखांवर रॉकेट बूस्टर्स लावलेली असतील ज्यामुळे विमानाला इतका वेग प्राप्त होऊ शकेल.
विमानाचे तापमान कमी ठेवण्यासाठी 'नासा'च्या काही उपकरणांचीही मदत घेतली जाईल.