www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
प्रेमाची कोणतीही ठराविक अशी परिभाषा नाही. खरं-खुरं प्रेम केवळ शब्दांत व्यक्त करणं तर अशक्यचं... पण, तरी आपण हा प्रयत्न नेहमीच करतो, नाही का?
लेखक, कवी आपलं प्रेम शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच वेळेस हे साध्यदेखील होतं. तर कधी कधी डोळ्यांची भाषाच सर्व काही बोलून जाते, शब्दांची गरजच पडत नाही. बऱ्याचदा आपलं त्या व्यक्तीशी वर्तनही आपलं प्रेम उघड करतं आणि समोरचा व्यक्ती आपल्या न उच्चारलेले शब्दही आपसूकच समजून जातो. पण, आपलं प्रेम व्यक्त करणं, प्रेमाचे चार शब्द बोलणं समोरच्या व्यक्तीला आनंद देऊन जातं आणि त्या नात्याची विण आणखी घट्ट होत जाते.
‘ह्युमन सायकोलॉजी’मध्ये आपलं प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती जगभरात जवळजवळ सारख्याच असल्याचं लक्षात आलंय... पाहुयात... काय आहेत या पद्धती...
आपल्या आवडत्या व्यक्तीचं कौतुक करा
‘आज तू खूप सुंदर दिसतेय’, ‘तुझी ही गोष्ट मला खूप आवडते’ सारखी छोटी छोटी वाक्यही समोरच्या व्यक्तीला खूप आनंद देऊन जातात. प्रेमाचा विचार सुरू असताना व्यक्तीच्या मेंदूत ‘फील गुड केमिकल्स’ सक्रिय होतात आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व गोष्टी आपल्यावर प्रभाव टाकतात.
‘त्या’ व्यक्तीला मदत करा
प्रत्येकाच्या स्वभावाचे पैलू वेगवेगळे असतात. कुणी कुणी दुसऱ्यांच्याच भानगडीत लक्ष घालतात तर कुणी कुणी स्वत:तच खूश असतात. पण, प्रेम ही भावनाच अशी आहे की समोरच्या व्यक्तीला झालेला त्रास तुम्हालाही त्रास देऊन जातो. त्यामुळे स्वत:साठी का होईना पण या व्यक्ती समोरच्या व्यक्तीला मदत करतात... कितीही मतभेद असले तरी!
एकमेकांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी वेगवेगळे ‘फंडे’ वापरणं
‘ती’ व्यक्ती नेहमी आपल्यासोबत असावी, असं वाटणं आणि त्यासाठी आपणं वेगवेगळी कारणं शोधून काढणं यातही वेगळीच मजा असते. बऱ्याचदा एखादी व्यक्ती काहीही न बोलता केवळ आपल्या शेजारी शांत बसून असणंही आपल्याला खूप काही देऊन जातं. चांगल्या-वाईट दिवसांत याच व्यक्तीची सोबत आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते.
प्रेमाचा स्पर्श
भावनेनं एकमेकांशी जोडलं जाणं आणि शारिरीक आकर्षण यात फरक असतो हे तुम्हीही मान्य कराल. पण, केवळ ‘त्या’ व्यक्तीचा केवळ हात पकडणं किंवा गळ्याशी घट्ट पकडणं सारख्या साध्या क्रियांमधूनही आपणं आपलं प्रेमच व्यक्त करत असतो.
प्रेमाची भेट
जगभरातील सगळ्या संस्कृतीत, प्रेमात एखादी छोटी का होईना पण भेटवस्तू दिली जाते. मग, ते समोरच्या व्यक्तीला खूश करण्यासाठी असो, इम्प्रेशन पाडण्यासाठी असो किंवा कोणत्याही स्वार्थाविना असो पण यातूनही तुम्ही तुमचं प्रेमच व्यक्त करत असता ना!
जर तुमच्याही ‘त्या’ खास व्यक्तीला ‘तुम्ही तिच्यावर प्रेमच करत नाही’ अशी तक्रार असेल तर हे फंडे आजमावून पाहा... शेवटी काय तर आपलं प्रेम त्या व्यक्तीपर्यंत पोहचणं गरजेचं आहे, नाही का!