पंकजांना सीएम करण्यासाठी काँग्रेसशी दोस्ती करु : जानकर

पंकजा मुंडे-पालवे यांना भाजपने मुख्यमंत्री नाही केले तर आम्ही ते प्रयत्न करु. त्यासाठी काँग्रेसशी दोस्ती करु आणि उद्धव ठाकरे यांच्या पाया पडू, अशी महादेव जानकर यांनी घेतलेय.

Updated: Jan 19, 2016, 09:41 PM IST
पंकजांना सीएम  करण्यासाठी काँग्रेसशी दोस्ती करु : जानकर title=

नागपूर  :  दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे-पालवे यांना भाजपने मुख्यमंत्री नाही केले तर आम्ही ते प्रयत्न करु. त्यासाठी काँग्रेसशी दोस्ती करु आणि उद्धव ठाकरे यांच्या पाया पडू, अशी भूमिका ष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी घेतलेय.

भाजपने जर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री केले तर ठीक, नाही तर पंकजा यांना मुख्यमंत्री मी करणार, हे भाजपने विसरता कामा नये, असा इशारा जानकर यांनी दिला. शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या पाया पडेन. वेळप्रसंगी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी दोस्ती करीन; पण मुख्यमंत्री आमच्या भगिनी पंकजा मुंडे यांनाच करणार असल्याचे जानकर यांनी सोमवारी सांगितले. 

देऊळगावराजा येथील राजयोगी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आमदार, खासदार होणे हे सोपे आहे; पण नेता होणे फार अवघड आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते नाहीत. ते केवळ CM आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीने घोटाळे केले. म्हणून जनतेने भाजपला मदत दिली; पण त्यांचाही दीड वर्षाचा अनुभव काही बरा नाही. जी माणसे आम्हाला हसत होती तीच आज सत्कारासाठी उभी आहेत. उपेक्षित समाज अपेक्षित ठिकाणी जात आहे हेच राष्ट्रीय समाज पक्षाचे ध्येय आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला पूरक असा जोडधंदा उभारला पाहिजे, असे ते यावेळी म्हणालेत.

वेगळा विदर्भ हवा
विदर्भा प्रांताचा विकास होण्यासाठी छोटी राज्ये व्हावीत, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. संयुक्त महाराष्ट्राचा दाखला देण्यात काही अर्थ नाही. विदर्भाचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही. त्यामुळे विदर्भ राज्य व्हावे ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे, असे जानकर म्हणालेत.