बीड : भगवानगडाची गेल्या अनेक वर्षांची दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडीत होण्याची चिन्हं आहेत. दसरा मेळाव्याच्या उपस्थितीवरुन महंत नामदेव शास्त्री सानप आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद पराकोटीला गेला आहे. महंतानी पकंजा मुंडे यांना राजकिय भाषण करण्यास मनाई केली आहे. तर पंकजा मुंडे यांनी चलो भगवानगड असं ट्विट करुन दसरा मेळावा होणारच असे संकेत दिलेत.
गोपीनाथ मुंडे यांनी गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून भगवानगड येथे दसरा मेळावा घेण्यास प्रारंभ केला होता. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर पंकजा यांनी परळीत गोपीनाथ गडाची निर्मिती केली तेव्हा दहा महिन्यांपूर्वी नामदेव शास्त्री यांनी आता यापुढे भगवान गडावरून राजकीय भाषण होणार नाही असे जाहीर केले होते.
पंकजा समर्थक आणि शास्त्री समर्थक यांच्यात मागील आठवड्यात गडावर हाणामाऱ्या झाल्या होत्या. त्यामुळे येथे मेळावा होणार नाही अशी शक्यता होती, मात्र पंकजा यांनी फेसबुक आणि ट्विटरवरून चलो भगवानगड चलो भगवानगड असे म्हणत मी येणार तुम्ही येणार ना असे आवाहन केल्याने वादाला तोंड फुटलं आहे.