टार्गेट पूर्ततेसाठी वडिलांना जुन्या गुन्हात अटक, मुलाची आत्महत्या

टार्गेट देण्यात आले त्यात जुन्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केल्यानं त्याच्या मुलानं आत्महत्या केली आणि पोलिसांची कार्यपद्धती उघडी पडली.

Updated: Jun 9, 2016, 07:54 PM IST
टार्गेट पूर्ततेसाठी वडिलांना जुन्या गुन्हात अटक, मुलाची आत्महत्या title=

औरंगाबाद : तोंडावर आलेले सण उत्सव आणि त्यातून पोलिसांना दिलेल्या टार्गेटचे काय दुष्परिणाम असतात याचे जळजळीत उदाहरण औरंगाबादेत समोर आलय. कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हेगार पकडण्याचे टार्गेट देण्यात आले त्यात जुन्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केल्यानं त्याच्या मुलानं आत्महत्या केली आणि पोलिसांची कार्यपद्धती उघडी पडली.

जुन्या गुन्ह्यात वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळं एका महाविद्यालयीन तरुणानं आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादच्या जिकठाण गावात घडलीय. पोलिसांनी केलेला अपमान १८ वर्षीय सागरच्या जिव्हारी लागला आणि त्यानं थेट विहीरत उडी मारून आत्महत्या केली. 

औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशानं सोमवारी रात्री ऑपरेशन ऑल आऊट ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांना आयुक्तांसमोर हजर करण्यात आलं होतं. वाळूज पोलिसांनी जिकठाणमधल्या ५३ वर्षीय हरिश्चंद्र नाडे यांना जुन्या गुन्हयावरून अटक केली. यावेळी सागर नाडेनं आपले वडील सुधारले असून त्यांना अटक करू नका, अशी पोलिसांना विनवणी केली. 

मात्र, पोलिसांनी त्याचं काही एक ऐकलं नाही. त्यानंतर पोलीस आयुक्तांनीही नाडे यांना सोडण्याचे आदेश दिले. तरीसुद्दा वाळूज पोलिसांनी ऐकलं नाही. उलट सागरलाच खूप शिव्या दिल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. सागरला हा अपमान सहन झाला नाही आणि त्यानं थेट आपलं आयुष्यच संपवल.

माझ्या मुलाच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं मुलाची आई सांगतेय. मुलगा हातापाया पडला. मात्र पोलिसांनी ऐकलं नाही आता माझा मुलगा परत येणार का, असा सवाल या माऊलीनं केलाय. दरम्यान, या प्रकरणी खासदार चंद्रकांत खैरै यांनी पोलिसांची दबंगगिरीच कारणीभूत असल्याचा आरोप केलाय आणि पोलिस आयुक्तांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. 

हरिश्चंद्र यांच्याविरुद्ध कलम ३२५चे दोन गुन्हे वाळूज ठाण्यात पूर्वी दाखल असल्याचं पोलीस सागतायत. मात्र टार्गेट वगैरे प्रकार असल्याचा आरोप फेटाळताय.. हा नियमित कारवाईचा भाग होता, मात्र आता संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली असल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिलीय.

सागरच्या मृत्यूनंतर जिकठाण गावात तणावाचं वातावरण आहे. या प्रकरणी दोषी कर्मचा-यांविरुद्ध चार दिवसांत कारवाई करण्याचं आश्वासनही पोलीस आयुक्तांनी दिलंय. त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात सागरवर अत्यंसस्कांर कऱण्यात आले. सागरनं मात्र या सगळ्यात आपला जीव गमावला आहे.