दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफूस, अडचणी वाढल्या

राज्यातल्या आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरु असताना समन्वय समितीच्या बैठकीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असमन्वय निर्माण झालाय. राष्ट्रवादीला समन्वय समितीच्या बैठकीबाबतचे पत्र देण्यात आले होते मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद न आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केला आहे. तर बैठकीच्या पत्राबाबतचा काँग्रेसचा दावा राष्ट्रवादीनं फेटाळून लावलाय.

Updated: Jul 23, 2012, 02:40 PM IST

www.24taas.com, मुंबई

राज्यातल्या आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरु असताना समन्वय समितीच्या बैठकीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असमन्वय निर्माण झालाय. राष्ट्रवादीला समन्वय समितीच्या बैठकीबाबतचे पत्र देण्यात आले होते मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद न आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केला आहे. तर बैठकीच्या पत्राबाबतचा काँग्रेसचा दावा राष्ट्रवादीनं फेटाळून लावलाय.

काँग्रेसकडून कोणतेही पत्र न आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिलीय. तर काँग्रेसनं सारवासारव करत लवकरच समन्वय समितीची बैठक बोलावण्यात येईल असं माणिकराव ठाकरेंनी नमूद केलंय. राष्ट्रवादीच्या उघड नाराजीनंतर आणि मुख्यमंत्री हटाव मोहीमेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांची महत्वाची बैठक मुंबईत झाली. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते या बैठकीला उपस्थित होते.

दिल्लीत आज राष्ट्रवादीची महत्वाची बैठक आहे. या बैठकीवर काँग्रेसचे नेते लक्ष ठेवून आहेत. या बैठकीनंतर काँग्रेसची पुन्हा बैठक होणार आहे. दिल्लीतल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. मुंबईत दोन दिवसांपूर्वी शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यात आघाडीतल्या समन्वयावर आणि एकूण मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवण्यात आलं होतं. केंद्रातल्या काँग्रेसच्या कारभारावर नाराज असलेल्या राष्ट्रवादीनं राज्यातलं नेतृत्व बदल करण्यासाठी काँग्रेसवर दबावाचं राजकारण सुरू केले आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीचा रोख असून त्यांना हटवण्याचे शर्थीचे प्रयत्न राष्ट्रवादीनं सुरू केले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये राजकीय हालचाली वाढल्यात. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी तातडीनं आमदारांची बैठक बोलावली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाष्य केलेलं नाही.