मुंबई : घाटकोपर येथील एका २५ वर्षीय विवाहितेला काहीतरी खायला देऊन तिला बेशुद्ध केले. त्यानंतर भोंदूबाबाने तिच्यावर बलात्कार करून पळ काढला. या विवाहितेच्या तक्रारीनंतर भोंदूला पोलिसांनी अटक केली.
नवीन मलिक (३५) असे या भोंदूबाबाचे नाव आहे. ही विवाहिता पती आणि आपल्या वडिलांसोबत घाटकोपर येथे राहते. विवाहितेच्या वडिलांना सांधेधुखीचा त्रास आहे. यावर उपचार करण्यासाठी परिसरात राहणाऱ्या बाबाकडे ती गेली. तो आयुर्वैदिक औषध देतो, असे तिला समजले. त्यानंतर ती वडिलांना घेऊन भोंदूबाबाकडे गेली. बाबाने दिलेल्या औषधाने काहीही फरक न पडल्याने ती पुन्हा त्याच्याकडे गेली नाही.
एकेदिवशी भोंदूबाबा या विवाहितेच्या घरी आला. तुमच्या वास्तूत दोष आहे. हा दोष दूर केल्यानंतर वडिलांना बरे वाटेल असे सांगितले. त्यानंतर बाबा ३ सप्टेंबरला पुन्हा महिलेच्या घरी गेला. त्यावेळी एक लिंबू दिले आणि सांगितले हे मंतरलेले आहे. ते दुसऱ्या ठिकाणी टाकून द्या, असे तिच्या वडिलांना सांगितले. तिचे वडील घराबाहेर पडल्यानंतर भोंदूने विवाहितेला खायला काहीतरी दिले. त्यानंतर ती विवाहिता बेशुद्ध पडली. त्यानंतर भोंदूने तिच्यावर बलात्कार केला आणि घरातून पसार झाला.
विवाहिता शुद्धीवर आल्यानंतर आपल्यावर संकट कोसळल्याची जाणीव झाली. त्यानंतर तिने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. तात्काळ तिने घाटकोपर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ३७६ च्या गुन्हा नोंदवत नवीन मलिक या भोंदूला अटक केली. त्याने आणखी कोणाला फसविले आहे का, कोणावर अत्याचार केलाय का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.