नवी मुंबई: खांदेश्वरमधील सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडलीय. ही दृष्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीत. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शुक्रवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी खांदेश्वरमधील सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर दगडफेक केली. या दगडफेकीत चर्चमधील सेंट जॉर्ज यांच्या पुतळ्याची काचेची संरक्षक पेटीही फुटलीय. ही दृष्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीत. बाईकवर बसून तोंडावर रुमाल बांधून आलेल्या या हल्लेखोरांनी दगडफेक केल्यानंतर पळ काढल्याचंही या दृष्यांत पाहायला मिळतंय.
सीसीटीव्ही फुटेज खांदेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या फुटेजवरुन याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करुन शोध सुरु केलाय.
तर अशा प्रकारचे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, तसंच या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय.
माथेफिरु समाजकंटकांचं हे काम असून नागरिकांनी शांतता पाळावी, असं आवाहन पोलिसांनी केलंय. शिवाय पोलिसांनी तात्काळ कोम्बिंग ऑपरेशनही सुरु केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.