मुंबई : अधिवेशनात आज अजब चित्र पाहायला मिळालं. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली... विरोधकांसोबत शिवसेनेचे आमदारही उभे राहून घोषणा देऊ लागले... इतकंच काय तर भाजपच्या आमदारांनीही कर्जमाफीच्या समर्थनार्थ घोषणा केल्या... त्यामुळे, नक्की शेतकऱ्यांचा पुळका कुणाला जास्त? असा प्रश्न उपस्थित झाला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज विरोधकांबरोबरच शिवसेनाही सरकारच्या विरोधात उभी राहिली. विधानसभेत विरोधकासोबत शिवसेनेच्या आमदारांनीही शेतकऱ्यांचा 'सात-बारा कोरा करा' अशा घोषणा दिल्या....
विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर काही क्षणात 15 मिनिटांसाठी आणि पुन्हा 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाज तहकूब केल्यावर विरोधकांप्रमाणेच काही भाजपचे आमदारही कर्जमाफीच्या समर्थनात घोषणाबाजी करू लागले.
खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी मागणी भाजपचे आमदार किसन कथोरेंनी केली. सध्या बँका चालवणारे कर्जमाफी मागतायत, असा आरोपही भाजपचे आमदार करताना दिसले.