www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
मिहानमुळे पाच हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. नागपुरकरांसाठी ही निश्चितच आनंदाची बाब समजली जात आहे. मिहान प्रकल्पामुळे नागपुरचा चेहरा-मोहरा बदलेल असं म्हटलं जातं.
विदर्भाच्या विकासाचा अग्रदूत म्हणून नागपूरच्या महत्त्वाकांक्षी मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट (मिहान) मुळे विदर्भात आशेचा एक नवा किरण दिसू लागला आहे. येत्या पाच वर्षात या प्रकल्पात २0 अब्ज डॉलरची परदेशी गुंतवणूक अपेक्षित आहे.
याशिवाय विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे.
मिहानमुळे २0२0 वर्षाअखेर १ लाख २0 हजार थेट, तर सुमारे ४ लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची सुरुवात यावर्षीपासून होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मिहानमधील एका मोठय़ा प्रकल्पाचा पहिला टप्पा जूनमध्ये सुरू होणार असून सुमारे पाच हजार लोकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
स्थानिकांना मिळणार प्राधान्य मिहानमध्ये रोजगार भरतीसाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. यावर्षी सुमारे पंधरा हजार युवकांना मिहानमधील टीसीएस, इन्फोसिस या सारख्या आयटी कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळणार आहे. मिहानमध्ये इन्फोसिस या कंपनीने १४२ एकर जागा घेतली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
जून महिन्यात टीसीएसचा पहिला टप्पा सुरू होणार असून यातून सुमारे ५ हजार नोकर्या उपलब्ध होणार आहेत. सध्या मिहान प्रकल्पात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे आठ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.
या कंपन्यांत स्थानिकांना रोजगार मिळणार असून विदर्भातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये येथील नावाजलेल्या अभियांत्रिकी संस्थांमधून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणे शक्य आहे. दोन्ही प्रकल्प पूर्णत: कार्यान्वित झाल्यानंतर १५ हजार जणांना रोजगार उपलब्ध होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.