www.24taas.com,पुणे
नव्या वर्षातही महिलांवरचे अत्याचार सुरूच आहेत. पुण्यात सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आलाय. हडपसर समर्थनगर परिसरातील धक्कादायक घटना घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यामध्ये पिडीत बालिका तिच्या आईबरोबर पुण्यामध्ये नातेवाईकांकडे आली होती. सकाळी साडेसातच्या दरम्यान ती घराबाहेर पडली असताना एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला.
या मुलीला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. अज्ञात आरोपीच्या विरोधात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ज्या परिसरात अशा घटना घडतात त्या परिसरात सुरक्षा वाढवण्याची मागणी आमदारांनी केलीय. तर या प्रकरणाचा राज्याच्या गृह मंत्र्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी म्हंटलंय.
दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या कटू घटनेनंच २०१२ वर्ष सरलं. आता २०१३ मध्ये तरी अत्याचार थांबतील, असं वाटत असतानाच, ही आशाही नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवसानं धुळीला मिळवलीय. पुण्यात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर नराधमानं बलात्कार केलाय. हडपसरमधल्या समर्थनगर या परिसरात ही घटना घडलीय. पुण्यात वेगानं विकसित होणारा हडपसर हा भाग कॉसमोपॉलिटिन समजला जातो.
अगदी गोर गरीबांपासून ते धनाढ्य लोकांची घरं या भागात आहेत. त्याच भागातल्या एका झोपडपट्टीत हा प्रकार घडलाय. नराधमाच्या वासनांना अवघी सहा वर्षांची चिमुरडी बळी पडलीय. तर ठाण्यात माथेफिरु तरुणानं एकतर्फी प्रेमातून एका मुलीवर हल्ला केलाय. ठाणे स्टेशनवरच ही घटना घडलीय. तर अकोल्यामध्ये गुंडाच्या छेडछाडीला कंटाळून एका मुलीनं आत्महत्या केलीय.
दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर सगळा देश पेटून उठला. तरीही या घटनांना आळा बसत नाहीय. त्यामुळे सामाजिक जागृती मानसिक विकृतींवर खरंच मात करु शकेल का, असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालाय.
तर दुसऱ्या एका घटनेत रेल्वेमध्ये जवाननं महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार घडलाय. यशवंतपूर-जोधपूर एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. ही ट्रेन पुण्यामध्ये आल्यावर प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे जवानाबाबत तक्रार केली. बोगी क्रमांक १२ मध्ये जवानानं महिलेशी असभ्य वर्तन केल्याचं कळताच प्रवाशांनी संताप व्यक्त केला.