www.24taas.com,झी मीडिया, पुणे
छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याप्रकरणी तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या तिघांमध्ये एक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे.
तिघांवरही तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला तळेगाव दाभाडे इथे हा तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. तिच्या घराजवळ राहणारा मुलगा या मुलीची छेड काढत होता. त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्यास ती पालकांसह तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली होती.
तक्रार पोलीस घेत नाहीत आणि छेडछाड यामुळे या मुलीने पंचवटी कॉलनीतल्या पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस ठाण्यासमोर रास्तारोको आंदोलन केलं. तसंच संबंधित पोलिस अधिका-यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करत मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला.
छेडछाड करणारा मुलगा तसंच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली. पोलीस उपअधीक्षक वैभव कलुबर्मे हे या प्रकरणाची चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर करतील. त्या चौकशीत दोषी आढळणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिल्यानंतर वातावरण निवळले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.