सिडनी : भारताने चौथी कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवले तरी ऑस्ट्रेलियन संघाने मालिका २-० ने जिंकली. दरम्यान, आम्ही सकारात्मक खेळ केला. मैदानावर कठीण प्रश्नाला तोंड दिले. या संघात दम आहे. कोणत्याही क्षणी आम्ही हाताला पांढरा रुमाल बांधून शरणागती पत्करली नाही. सतत लढत राहिलो,असे प्रतिपादन टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केले.
टीम इंडियाच्या खेळाडूंनी दडपणाना खाली खेळ केला. त्यामुळे त्यांची कामगिरी चांगली राहिली नाही. मात्र, खराब झालेल्या खेळपट्टीवर संयमी खेळ करून ९० ओव्हर्सपर्यंत तग धरली आणि चौथी क्रिकेट कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवले.
नव्या चेहऱ्याच्या भारतीय संघाने लक्षणीय लढत देताना ऑसी प्रेक्षक आणि जाणकारांची मने सकारात्मक खेळाने जिंकली. पाचव्या दिवशी फलंदाजांनी बचाव करून ७ बाद २५२ रन्सपर्यंत मजल मारून कसोटी अनिर्णित राखली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ सामन्याचा आणि मालिकेचा मानकरी ठरला.
स्टीव स्मिथने चौथ्या दिवशीच्या धावसंख्येवरच डाव घोषीत केला. भारतीय संघाला विजयाकरिता ९० षटकांत ३४९ रन्सचे आव्हान दिले गेले. मुरली विजय आणि लोकेश राहुलने एक तास चांगली फलंदाजी करून ऑस्ट्रेलियन संघाला अपेक्षित यश मिळू दिले नाही. विराट कोहलीचा कित्ता गिरवताना स्टीव स्मिथनेही नॅथन लियॉनला नव्या चेंडूवर फिरकी गोलंदाजी करायला बोलावले. राहुलची विकेट लियॉनने काढली. मुरली विजय सहज, तर रोहित शर्मा खूप अडखळत खेळत होता. उपहारापर्यंत दोघांनी धीराने तग धरला. उपहारानंतर रोहित लगेच बाद झाला तो वॉटसनचा चेंडू उजव्या स्टंप बाहेरचा होता.
विराट कोहलीला साथीला घेत चहापानापर्यंत २ बाद १६० अशी खिंड लढवली. मिचेल स्टार्कने कप्तान कोहली ३८, तर सुरेश रैनाला शून्यावर बाद केले. रैना दोनही डावात भोपळाही फोडू शकला नाही. अजिंक्य रहाणेने बचावात्मक फलंदाजी केली आणि संभाव्य धोका टाळला. रहाणेला काही काळ अश्विनने आणि नंतर भुवनेश्वरकुमारने समंजस साथ दिली. शेवटी रहाणे ३८, तर भुवनेश्वर २० रन्सवर नाबाद राहिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.