www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चिलीमध्ये ८.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असतानाच कोकणातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. चिपळूण, संगमेश्वर, कोयना, पाटण परिसरात भूकंप झाला. तर चिपळूण आणि उक्षी या कोकण रेल्वेच्या स्टेशन दरम्यान धक्के बसल्याने तीन एक्सप्रेस गाड्या थांबविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला.
सकाळी ७.३३ वाजण्याच्या दरम्यान भूकंपनाचे धक्के झालेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. कोकण रेल्वेच्या मार्गावरील चिपळूण, कामथे, सावर्डे, संगमेश्वर, उक्षी या स्टेशनदरम्यान हे धक्के जाणवलेत. त्यानुसार कोकण रेल्वे प्रशासन सर्तक झाले. त्यानंतर रेल्वे अधिकारी, अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी मार्गाची पाहाणी केली.
दरम्यान, भूकंपाचे सौम्य धक्के बसल्यानंतर सुरक्षितता म्हणून तीन एक्सप्रेस गाड्या काही वेळ थांबविण्यात आल्यात. १२४३२ हे राजधानी एक्सप्रेस ३५ मिनिटे, १२६१७ मंगला एक्सप्रेस एक तास तर १९५७७ तिरुवेली-हापा एक्सप्रेस ४५ मिनिटे थांबविण्यात आली होती. त्यामुळे या गाड्या उशिराने धावत आहेत. ९.२० मिनिटाने कोणताही धोका नसल्याचे लक्षात आल्यानंतर या गाड्या मार्गस्थ झाल्यात, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.