नवी दिल्ली : इंटरनेट वापराच्या बाबतीत भारत जगातील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या अमेरिकेला लवकरच मागे टाकणार असल्याचं सांगितलं जात आहे.
यावरून भारत इंटरनेट वापरामध्ये अमेरिकेलाही मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी ऑनलाइन बाजारपेठ ठरणार आहे.
भारतातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या आता या वर्षअखेरीपर्यंत ३० कोटी २० लाखांवर पोचण्याची शक्यता आहे.
इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि आयएमआरबी इंटरनॅशनल यांच्या एका अहवालानुसार भारतातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ३२ टक्क्यांनी वाढून ती २१ कोटी ३० लाखांवरून डिसेंबरअखेर ३० कोटींच्या वर जाईल.
चीनमध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ६० कोटी एवढी आहे, तर अमेरिकेत २७ कोटी ९० लाख लोक इंटरनेट वापरतात.
भारतातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या जून २०१५ पर्यंत ३५ कोटी ४० लाख एवढी होईल असे अहवालात नमूद आहे.
'भारतातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या एक कोटीवरून दहा कोटीपर्यंत जाण्यासाठी दहा वर्षे लागली. परंतु, दहा कोटींवरून वीस कोटींपर्यंतची संख्या केवळ तीन वर्षांत गाठली.
त्याचप्रमाणे २० कोटींवरून ३० कोटीपर्यंत संख्या जाण्यासाठी केवळ एक वर्ष लागले. इंटरनेट हा भारतातील मुख्य प्रवाह बनला आहे हे यावरून स्पष्ट होते,' असे या अहवालात सांगण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.