मुंबई राखली, आता महाराष्ट्र जिंका !

शिवसेनेनं अखेर मुंबईत 'जिंकून दाखवलंच'. या शहरावर शिवसेनेच्या वाघाची पकड किती मजबूत आहे, हेच यातून दिसून आलं. शिवसेनाप्रमुखांची जंगी सभा आणि वॉर्डा-वॉर्डात पसरलेलं शिवसैनिकांचं जाळं या ताकदीवर मुंबई महापालिकेवरील भगव्याचा डौल पुन्हा कायम राहिला.

Updated: Mar 3, 2012, 07:35 PM IST
संतोष गोरे
शिवसेनेनं अखेर मुंबईत 'जिंकून दाखवलंच'. या शहरावर शिवसेनेच्या वाघाची पकड किती मजबूत आहे, हेच यातून दिसून आलं. शिवसेनाप्रमुखांची जंगी सभा आणि वॉर्डा-वॉर्डात पसरलेलं शिवसैनिकांचं जाळं या ताकदीवर मुंबई महापालिकेवरील भगव्याचा डौल पुन्हा कायम राहिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आघाडी, मनसेमुळे मराठी मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता या सगळ्यांवर शिवसेना, भाजप, रिपाइंच्या महायुतीनं लिलया मात करून विजय साकारला.

ठाण्यातही काँग्रेस आघाडीला पराभवाचं तोंड पहावं लागलं. मुंबई, ठाणे, उल्हासनगर आणि नागपूरमध्ये यश मिळवणा-या महायुतीला पुणे, सोलापूर, पिंपरी - चिंचवडमध्ये पराभव पत्करावा लागला. नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजपनं स्वबळावर लढण्याचा प्रयोग करून कपाळमोक्ष ओढवून घेतला. भाजपला निवडणुकीच्या तोंडावर युती तोडण्याची बुध्दी झाली आणि महायुतीची वाताहत झाली.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि सोलापूरात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं यश मिळवलं. महापालिकांच्या बरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही लढवल्या जात होत्या. जिल्हा परिष आणि पंचायत समितीसाठी महानगर पालिकेच्या आधी मतदान झालं होतं. मात्र मोठ्या महापालिकांच्या लढाईमध्ये माध्यमांचं जिल्हा परिषदांकडे दुर्लक्ष झालं होतं.


महापालिकांसाठी जोरदारपणे लढणा-या शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचंही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे लक्ष नव्हतं. तरीही जालना आणि हिंगोलीची जिल्हा परिषद युतीनं काबीज केली. हिंगोलीत तर शिवसेनेची एकहाती सत्ता आली. धाराशिव जिल्हा परिषदमध्येही शिवसेनेचे तेरा सदस्य निवडून आले. या तिन्ही ठिकाणी महायुतीचा कोणताच मोठा नेता प्रचारासाठी गेला नव्हता. स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी हा विजय संपादन केला. मराठवाड्याप्रमाणेच विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र या भागात महायुतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडं लक्ष दिलं नाही. महायुतीच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका गांभीर्यानं घेतल्या असत्या तर अधिक मोठं यश मिळवता आलं असतं. महायुतीच्या नेत्यांनी शहरांबरोबरच ग्रामीण भागाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. कारण ग्रामीण भाग हा काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जहागीरदारी नव्हे.
शिवसेनेलाही आता प्रत्येक विभागात नेत्यांची दुसरी फळी उभारावी लागणार आहे. मुंबईतल्या नेत्यांच्या जीवावर किती काळ निवडणुका लढवायच्या ? याचा विचार पक्षानं करायला हवा. मराठवाडा आणि विदर्भावर छाप टाकणार एकही स्थानिक नेता पक्षाला निर्माण करता आलेला नाही. या भागात जर दुस-या फळीतला स्थानिक नेता असता तर त्या-त्या भागात शिवसेनेला जोरदार प्रचार करून मोठ्या प्रमाणात यश मिळवता आलं असतं.
या यशानंतर आता महायुतीचा आत्मविश्वास नक्कीच बळावला असणार. परिणामी आगामी विधानसभा निवडणुका महायुती जोरकसपणे लढवणार, यात शंका नाही. काँग्रेसच्या आघाडी सरकारकडे पैसा असला तरी महायुतीकडे असणारी जिद्द आघाडीला पुरून उरेल. त्यामुळं महापालिकांमध्ये यशस्वी ठरलेली महायुती आगामी विधानसभा निवडणुका जिंकणारच.