मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेल्या आशिष नेहराला प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाली आहे. आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा बॉलिंग प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर गॅरी कर्स्टनची बंगलोरचा बॅटिंग प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. डॅनिअल व्हिटोरी बंगलोरचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहे.
गॅरी कर्स्टन यांनी याआधी २०१५ साली दिल्ली डेअरडेव्हिल्सचं प्रशिक्षकपद भुषवलं होतं. कर्स्टन भारतीय टीमचे प्रशिक्षक असताना नेहरा टीमचा हिस्सा होता.
२७ आणि २८ जानेवारीला आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्याआधी ४ जानेवारीला आयपीएल टीमना कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. कोणत्या खेळाडूंना कायम ठेवायचं किंवा लिलावामध्ये राईट टू मॅच कार्ड वापरून कोणत्या खेळाडूंना विकत घ्यायचं याबाबत जवळपास सगळ्याच टीमनी निश्चत केलं आहे.