एशियन क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षपदी जय शाह, सलग तिसऱ्यांदा मिळाली जबाबदारी

Asian Cricket Council : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची पुन्हा एकदा एशिय क्रिकेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सलग तिसऱ्यांदा जय शाह यांची या पदावर नियुक्ती झाली आहे   

राजीव कासले | Updated: Jan 31, 2024, 05:05 PM IST
एशियन क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षपदी जय शाह, सलग तिसऱ्यांदा मिळाली जबाबदारी title=

ACC President: एशियन क्रिकेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदी जय शाह (Jay Shah) यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. एशियन क्रिकेट काऊन्सिलच्या (Asian Cricket Council) वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जय शाह यांची सलग तिसऱ्यांदा एशियन क्रिकेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. जय शाह यांचा कार्यकाल वाढवण्याचा प्रस्ताव श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी बैठकीत ठेवला. या प्रस्तावावर सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली आणि एकमताने जय शाह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. जय शाह यांनी पहिल्यांदा जानेवारी 2021 मध्ये एशिय क्रिकेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्याआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन एशियन क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष होते. 

इंडोनेशियात वार्षिक बैठकीचं आयोजन
इंडोनेशियातल्या बालीमध्ये एशियन क्रिकेट काऊन्सिलच्या वार्षिक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. एशियन क्रिकेट काऊंसिलच्या सर्व सदस्यांनी या बैठकीत सहभाग नोंदवला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत मीडिया राईट्स आणि फॉर्मेंटवरही चर्चा करण्यात आली. 2025 मध्ये होणारी एशिया कप स्पर्धा टी20 पद्धतीने खेळवली जाणार आहे. त्याआधी एशिया कप 2024 स्पर्धा एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवण्यात आली होती. याचं यजमानपद श्रीलंकेकडे होतं. आता एशिया कप 2025 स्पर्धा ओमान आणि संयुक्त अरब अमीरातीत खेळवली जाण्याची शक्यता आहे.

कोण आहेत जय शाह?
जय शाह हे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव (BCCI Secretary) आहेत. देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांचे ते पूत्र (Son of Amit Shah). जय शाह यांचा जन्म 22 सप्टेंबर 1988 मध्ये झाला(Jay Shah Age). त्यांनी निरमा विश्वविद्यालयातून बी.टेकची पदवी घेतली. त्यानंतर जयेंद्र सहगल यांच्या नेतृत्वात त्यांनी अहमदाबादमध्ये क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं. (Jay Shah Education). जय शाह यांच्याकडे कुसुम फिनझर्व्हचे 60 टक्के शेअर्स आहेत. 2015 मध्ये याची स्थापना झाली होती. 

सप्टेंबर 2013 मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त सचिवपदी जय शाह यांची निवड झाली. त्यावेळी त्यांचे वडिल अमित शाह गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. 2015 मध्ये जय शाह भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वित्त व पणन समितीचे सदस्य बनले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी जीसीएच्या संयुक्त सचिव पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना दीड वर्षांसाठी बीसीसीआयच्या सचिवपदी निवडण्यात आली. 2019 मध्ये बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत पाठवलं. तर 2021 मध्ये जय शाह यांना एशियाई  क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. 

2015 फेब्रुवारीमध्ये जय शाह यांनी कॉलेज गर्लफ्रेंड ऋषिता पटेल यांच्याबरोबर लग्न केलं. लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अनेक नेते सहभागी झाले होते.