दुबई : टीम इंडियाने (Indian Cricket Team) इंग्लंडवर चौथ्या कसोटी सामन्यात 157 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांसह फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह या तिकडीने चौथ्या कसोटीत उल्लेखनीय कामगिरी केली. या कामगिरीचा या तिकडीला आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC TEST RANKING) फायदा झाला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) फलंदाजांच्या क्रमावारीत पाचव्या स्थानावर कायम आहे. मात्र रोहितचे रॅकिंग पॉइंट्सनी 800 चा टप्पा गाठला आहे. कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच रोहितच्या रेकिंग पॉइंट्स हे 800 पल्स गेले. रोहितने चौथ्या कसोटीत 127 धावांची शतकी खेळी केली होती. रोहितचं हे परदेशातील पहिलंवहिलं शतक ठरलं. बॅट्समनच्या रँकिंगमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रुट अव्वल स्थानी आहे. त्यानंतर अनुक्रमे न्यूझीलंडचा केन विलियमन्सन, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन आणि त्यानंतर पाचव्या क्रमांकावर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली विराजमान आहे. (Icc test ranking team india rohit sharma rating points is cross 800 and jasprit bumrah jumped 9th positon and shardul thakur come top 20 list)
बुम बुम बुमराह!
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) गोलंदाजांच्या क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. बुमराहने 10 व्या स्थानावरुन 9 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. बुमराहचे रेटिंग्स पॉइंट्स हे 771 इतके आहेत. बुमराहने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत शानदार बॉलिंग केली. बुमराहने सामन्यातील चौथ्या डावात 6 ओव्हरचा निर्णायक स्पेल टाकला. बुमराहने या 6 ओव्हरच्या स्पेलमध्ये अवघ्या 6 रन्स देत 2 महत्त्वाचे विकेट्स घेतले. बुमराहने ओली पॉप आणि जॉनी बेयरस्टोला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पॅट कमिन्स आहे. तर दुसऱ्या स्थानी टीम इंडियाचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आहे. दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा महत्त्वाचा गोलंदाज जेम्स एंडरसनची घसरण झाली आहे. एंडरसन 8 व्या स्थानावरुन 7 व्या स्थानी घसरला आहे.
शानदार शार्दुल
शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) इंग्लंडचा बॅटिंगसह बोलिंगने समाचार घेतला. शार्दुलने निर्णायक क्षणी टीम इंडियाला विकेट्स मिळवून दिले. सोबतच दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली. शार्दुलने या खेळीच्या जोरावर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत टॉप 20 मध्ये धडक मारली आहे. शार्दुलला फायदा झाला आहे. शार्दुल क्रमवारीत 20 व्या क्रमांकावर पोहचला आहे. तर इंग्लंडच्या ख्रिस वोक्सलाही फायदा झाला आहे. वोक्स 10 व्या स्थानी पोहचला आहे. वोक्सने टीम इंडियाच्या 4 विकेट्स घेतल्या. सोबतच 50 धावांची अर्धशतकी खेळी केली.
पाचवा सामना केव्हा?
दरम्यान या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा 10 सप्टेंबरपासून मॅनचेस्टरला खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून एकतर्फी मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. तर इंग्लंडचा मॅच जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे नक्की मालिकेचा निकाल काय लागणार, हे लवकरच समजेल.