IND vs AUS ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिका संपली असून आता वनडे मालिका होणार आहे. या आठवड्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. तर दिल्लीतील दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशी परतलेला ऑस्ट्रेलियाचा निरमित कर्णधार पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ODI Series) वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होत आहे.
कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) वैयक्तिक कारणांमुळे दिल्लीतील दुसऱ्या कसोटीनंतर दौरा सोडला. गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळला जात असताना कर्णधार पॅट कमिन्सच्या आईचे स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले. पॅट परत येणार नाही, तो त्याच्या कुटुंबासोबत आहेत. तो कठीण परिस्थितीतून जात असल्याची माहिती प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी दिली. याचाच अर्थ मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व केल्यानंतर स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय मालिकेत कर्णधार म्हणून कायम राहील.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अनिर्णित राहिला. ज्यामुळे टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. इंदूरमध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील एक सामना ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. पॅट कमिन्सने गेल्या वर्षी अॅरॉन फिंचच्या निवृत्तीनंतर एकदिवसीय क्रिकेटची कमान हाती घेतली होती. परंतु त्याने आतापर्यंत केवळ दोन सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांचा विक्रम पाहिल्यास, आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 143 सामने झाले आहेत. त्यापैकी 80 ऑस्ट्रेलियाने आणि 53 भारताने जिंकले आहेत. भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यांवर नजर टाकल्यास, दोन्ही संघ एकूण 64 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने 30 आणि भारताने 29 एकदिवसीय सामने जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलिया संघ: स्टीव्ह स्मिथ (क), शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट