मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवन सध्या आपल्या कुटुंबाला वेळ देतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी शिखरची संघात निवड असताना बायकोच्या आजारपणामुळे शिखरला मालिकेत सामील होता आले नाही. शिखरच्या अनुपस्थितीत त्याची जागा अजिंक्य रहाणेने घेतली आहे.
शिखरची पत्नी आयेशा धवन ही आजारी असून नुकतीच तिच्यावर एक शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यामुळे पत्नी आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी शिखराला दौरा अर्धवट सोडावा लागला. आपला प्राधान्यक्रम अचूक हेरत शिखर आपली जबाबदारी नीट पार पडतो आहे. त्याने चक्क आपल्या मुलांसाठी नाश्ता बनवला. त्याचा एक व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.
हा व्हिडीओ शेअर करत त्याने एक मेसेज देखील लिहिला आहे. तो म्हणतो, "सकाळी मुलांसाठी नाश्ता बनवणे मी एन्जॉय केले. माझ्या बायकोची जागा घेण्याचा मी प्रयत्न करतोय. पण मला माहित आहे ते कधीच शक्य नाही. तरी देखील मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय."