Pune Porsche Accident: 'बालन्याय मंडळाचा धिक्कार असो!' अमृता फडणवीसांचा संताप; म्हणाल्या, 'आरोपीला..'

Amruta Fadnavis On Pune Porsche Accident: 19 मे रोजी रात्री पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन तरुण अभियंत्यांनी प्राण गमावले. या अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुणाने उपचारादरम्यान प्राण सोडले.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 22, 2024, 02:23 PM IST
Pune Porsche Accident: 'बालन्याय मंडळाचा धिक्कार असो!' अमृता फडणवीसांचा संताप; म्हणाल्या, 'आरोपीला..' title=
अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला संताप

Amruta Fadnavis On Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या पोर्शे कारच्या अपघातामध्ये दोन तरुण अभियंत्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचं प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेत असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच फडणवीस यांनी बालन्याय मंडळाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. आता फडणवीसांपाठोपाठ त्यांची पत्नी अमृता फडणवीसांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन आपलं मत मांडलं आहे.

फडणवीस काय म्हणाले?

फडणवीस यांनी या प्रकरणी मंगळवारी पुण्यात जाऊन पोलिसांकडून सदर प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आल्याचं सांगत कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं. तसेच आरोपीविरोघात सज्ञान म्हणून कारवाई करण्याची करण्याची परवानगी आणि पोलिस कोठडी दिली जावी अशी मागणी बालन्याय मंडळाकडे केली होती. मात्र बालन्याय मंडळाने अर्ज फेटाळत जामीन मंजूर केला. हा निर्णय पोलिसांसाठी धक्कादायक होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही बालन्याय मंडळाकडे सर्व पुरावे दिले होते. यामध्ये मुलाच्या पार्टीचे फोटो, गाडीसंदर्भातील पुरावे दिले होते. मात्र तरीही निकाल फारच आश्चर्यकारक लागला. बालन्यायालया मंडळाची भूमिका सरकार तसेच लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असं फडणवीस यांनी पत्रकरांना प्रतिक्रिया देताना सांगितलं.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

अमृता फडणवीस यांनी 22 मे रोजी दुपारी 12 वाजून 59 मिनिटांनी पुणे पोर्शे अपघातप्रकरणी पोस्ट केली आहे. "अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांच्या कुटुंबाप्रती मी सहवेदना व्यक्त करते. आरोपीला कठोर शिक्षा दिली पाहिजे. बालन्याय मंडळाचा धिक्कार असो," अशा शब्दांमध्ये अमृता फडणवीस यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

नक्की वाचा >> Pune Porsche Accident: 'त्या' मुलामुळे आमदारपुत्राने सोडलेली शाळा! आमदाराची पत्नी म्हणाली, 'माझ्या मुलासोबत..'

 

पोलिसांनी दाखल केली याचिका

दरम्यान, बालन्याय मंडळाने जामीन मंजूर केल्यानंतर पोलिसांनी तातडीने वरिष्ठ न्यायालयामध्ये अर्ज केला. न्यायालयाने त्याची दाखल घेतली आहे. कायद्यानुसार बालन्यायालय मंडळाच्या निकालाचा फेरविचार त्याच न्यायालयात करावा लागतो. या न्यायालयाने फेरविचार केला नाही तर वरिष्ठ न्यायालयात जावं लागतं. न्यायालय निश्चितपणे या प्रकरणी फेरविचार करेल असं फडणवीस मंगळवारी म्हणाले होते. या प्रकरणामध्ये आज या अल्पवयीन मुलाला बालन्याय मंडळासमोर हजर करण्यात आलं. या प्रकरणी दुपारी सुनावणी सुरु झाली. या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला पोलिसांनी मंगळवारी संभाजीनगरमधून अटक केली आहे.