नवी दिल्ली : कुलभूषण जाधव प्रकरणी पुढच्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. १८ ते २१ फेब्रुवारी या चार दिवसांत कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे. हेरगिरी आणि घातपाती कृत्यं केल्याच्या आरोपावरून एप्रिल २०१७ ला कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं.
फेब्रुवारी महिन्यातल्या या सुनावणीत पहिल्या टप्प्यात १८ फेब्रुवारीला भारत आपली बाजू मांडेल. त्यानंतर १९ फेब्रुवारीला पाकिस्तान आपली बाजू मांडणार आहे. सुनावणीच्या दुसऱ्या टप्प्यात २० तारखेला भारत पाकिस्तानने मांडलेल्या मुद्द्यावर पुन्हा आपली बाजू मांडेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा २१ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानला आपली बाजू मांडता येणार आहे.
कुलभूषण जाधव भारतीय नागरिक आहे. पाकीच गुप्तचर यंत्रणा आयएसआयनं जाधव यांचं ईराणहून अपहरण करत त्यांना अटक केली होती. भारताचा गुप्तहेर असल्याचं सांगत पाकिस्तान कोर्टानं त्यांना मृत्यूदंड ठोठावला होता.
२५ मार्च २०१६ पासून कुलभूषण जाधव सलग कॉन्स्युलर एक्सेसची मागणी करत आहेत. २०१६ मध्येच पाकिस्तानातील भारतीय उच्चयोगाकडून जाधव यांच्या अटकेची माहिती मिळाली होती. पंरतु, आजपर्यंत पाकिस्ताननं जाधव यांना कॉन्स्युलर एक्सेस दिलेला नाही.
त्यामुळे, भारतानं ८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर हे प्रकरण नेलं. कॉन्स्युलर एक्सेस नाकारून पाकिस्ताननं कराराचं उल्लंघन केल्याचंही भारतानं म्हटलंय. विएना कराराद्वारे दोन्ही देशातील कैद्यांना कॉन्स्युलर एक्सेस देणं गरजेचं आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयानं १८ मे २०१७ रोजी जाधव यांची फाशीची शिक्षा स्थगित केली. प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देण्यात येऊ नये, असे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेत.