What Is The 80 20 Diet plan : सारखं बसून असतो... हालचालच होत नाहीये, सारखं खात असतो, कळत नाही वजन कसं वाढतंय.... हे असे सूर सध्याची तरुणाई इतकंच नव्हे तर, मध्यम वयोगटातील अनेक व्यक्तीसुद्धा आळवताना दिसतात. बदललेली जीवनशैली, सातत्यानं कामाच्या ठिकाणी वाढणारा ताण आणि अपेक्षांचं ओझं आणि त्यातूनच मनाला वाटेल- आवडेल ते खाणं आणि किमान आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा या सवयी सध्या आरोग्यास घातक ठरताना दिसत आहेत.
काही क्षणांच्या आनंदासाठी चवीला सुरेख असणाऱे अनेक खाद्यपदार्थ खाण्याला बरीच मंडळी प्राधान्य देतात. काहीजणांच्या जीवनात तर, झोप आणि खाणं याव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टींना प्राधान्य असतं. तर, कामाच्या व्यापामुळं व्यायामाला वेळच मिळत नाहीत, असं म्हणत अनेकजण पोटाच्या वाढलेल्या घेराकडे निराशेनं आणि तितक्याच चिंतेनं पाहतात. यावर उपाय काय?
वाढतं वजन आणि त्यामुळं होणाऱ्या समस्यांवर मात करत वजन कमी करण्यासाठी सध्या Dieting विश्वात एका नव्या मंत्राची चर्चा आहे. त्याचं नाव आहे 80/20 diet. इथं आवडीच्या खाद्यपदार्थांकडे पाठ न फिरवता तुम्ही मनसोक्तपणे एका चांगल्या जीवनशैलीसाठी तुम्हाला प्रोत्साहित करत राहील.
या डाएट प्लानमध्ये कोणत्याही प्रकारच्या पूर्वनियोजित आखणीची गरज नाही. इथं तुम्ही 80 टक्के प्राधान्य चांगल्या आणि पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहाराला देणं अपेक्षित असतं. शिवाय वेळच्या वेळी खाण्याच्या सवयीसुद्धा हळुहळू वजन नियंत्रणात आणण्यास मदत करतात.
आठवड्यातल्या एखाद्या वारी आवडीचे (चटकदार, चमचमीत पदार्थ, गोडधोड) खात, उर्वरित दिवसांना सर्व प्रकारच्या भाज्या, डाळी, कडधान्य, मांस-मासे- अंडी, फळं, चपाती, भात, भाकऱ्या अशा पदार्थांचा समावेश करून करून सोबतीला सॅलड किंवा एखाद्या कोशिंबिरीची जोड देत तुम्ही साग्रसंगीत आहारानंही वजन नियंत्रणात आणू शकता.
सहसा आहाराच्या सवयींमध्ये आलेल्या बदलांमुळं व्यक्तीच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर याचे थेट परिणाम होतात. पण, 80/20 डाएटमध्ये होणारे परिणाम सकारात्मकच असल्याची हमी अनेक तज्ज्ञ देतात.
त्यामुळं केटो डाएट, नो कार्ब्स डाएट, शुगर फ्री- सॉल्ट फ्री डाएट अशा पद्धतीच्या डाएट प्लानमध्ये स्वारस्य दाखवून सुरुवातीच्या काही दिवसांनंतर अपयशाला सामोरं जाण्यापेक्षा हा नवा फॉर्म्युला एकदातरी वापरून पाहा.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)