दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडंटमध्ये शिंदे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला शिवसेनेचे 14 खासदार (Shivsena MP) हे थेट दिल्लीतून ऑनलाईन सहभागी झाले होते अशी माहिती पुढे आली आहे.
यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. जे काही वृत्त माध्यमांतून दाखवण्यात आलं, तो प्रकार म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सीझन 2 आहे. कॉमेडी एक्सप्रेस सीझन 1 हा विधीमंडळात झाला आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
सुप्रीम कोर्टात फुटीर गटाच्या भवितव्याचा निर्णय लागेल आणि आम्हाला खात्री आहे ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेची शिवसेनेची जी याचिका आहे, ती कायद्याच्या नियमांच्या आधारावर पक्की आहे. आम्हाला न्यायालयात न्या मिळेल असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
भीतीमुळे आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली, पण एक गट राष्ट्रीय कार्यकारणी कशी काय स्थापन करु शकतो, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तो फुटीर गट आहे आणि फुटीर गटाला अजून पक्ष म्हणून मान्यता नाही, तो फुटीर गट बाळासाहेब ठाकरे यांच्या 56 वर्षांच्या शिवसेनेची कार्यकारणी बरखास्त करतो आणि स्वत:ची कार्यकारणी जाहीर करतो असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी लोकं हसतायत, मजा घेत आहेत असा टोला लगावला.
स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी स्वत:चे आमदार सांभाळण्यासाठी ही धडपड सुरु आहे. जे सोडून गेले आहेत, त्यांच्याशिवाय शिवसेना भक्कमपणे उभी आहे. शिवसेनेचं नेतेमंडळ हे बाळासाहेब ठाकरे यांनी आणि कार्यकारणीने निर्माण केलं आहे. शिवसेनेचे सर्व नेतेमंडळी ही राष्ट्रीय कार्यकारणीच्या माध्यमातून नेमले गेलेले असतात. शिवसेना हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. पक्षातून फुटून गेलेल्यांना आमची कार्यकारणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार नाही असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
लोकांना आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्यांना भ्रमित करण्याचे हे सर्व प्रकार सुरु आहेत. त्याचा शिवसेनेवर काही एक परिणाम होणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.