बारामती : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निंबुत येथे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारु विक्री सुरु आहे. ही अवैध दारू विक्री करणाऱ्या प्रकाश चैनसिंग नवले याच्याविरोधात पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली.
प्रकाश नवले याच्यावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात २५ गुन्हे दाखल आहेत. हा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्याकडून मंजूरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूरी देत नवले याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणानंतर जिल्हाधिकारी यांनी अवैध दारू विक्री प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची कुंडली तयार करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी बारामती उपविभागातील सहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध हातभट्टीची दारु विकणाऱ्यांची एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याची यादी बनविली आहे.
यापुढील काळात अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कठोर कारवाई करणार आहेत. त्याअंतर्गत दोनशे जणांवर तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच या सर्वावर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली.