राज ठाकरेंना हिसका दाखवेन म्हणणारे बृजभूषण सिंह पुणे दौऱ्यावर; विरोध करण्यावरुन मनसेत फूट?

Brijbhushan Singh : राज ठाकरे उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबाबत जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले होते

Updated: Dec 9, 2022, 04:55 PM IST
राज ठाकरेंना हिसका दाखवेन म्हणणारे बृजभूषण सिंह पुणे दौऱ्यावर; विरोध करण्यावरुन मनसेत फूट? title=
(फोटो सौजन्य - PTI)

Brijbhushan Singh : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्येच पाय ठेवू देणार नाही असे म्हणणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे नाव चर्चेत आले होते. उत्तर प्रदेश गोरखपूरचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यानंतर आता याच बृजभूषण सिंह यांना रोखण्याची भाषा करणाऱ्या मनसेचा (MNS) विरोध मावळलेला दिसत आहे. खासदार बृजभूषण सिंह 15 डिसेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांना कोणताही विरोध करणार नसल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलीय. मनसेच्या या मवाळ भूमिकेची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने बृजभूषण सिंह पुण्यात येणार आहेत. मात्र मनसे बृजभूषण सिंह यांना कोणताही विरोध करणार नाही, अशी माहिती मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी दिली आहे. 

राज ठाकरेंच्या आदेशामुळे शांत

"मनसेची ही भूमिका राज ठाकरे यांनीच ठरवलेली आहे. बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्यावरुन महाराष्ट्र सैनिक किंवा कोणताही नेता याविषयी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. राज ठाकरे यांच्या आदेशामुळे सर्व मनसैनिक शांत आहेत. राज ठाकरे जरी अयोध्येला गेले नसले तरी मनसैनिकांनी आयोजित जाऊन दर्शन घेतलं होते. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकाची ताकद किती आहे हे संपूर्ण देशाला माहित आहे," असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे. 

तर आमच्याही अंगाला लाल माती लागली आहे. त्यामुळे कुस्ती कशी खेळायची याविषयी देखील आम्हाला चांगलेच माहित आहे, असा इशाराही वसंत मोरे यांनी दिला आहे.

शरद पवार यांनी बृजभूषण नावाची शेळी बांधली

तर दुसरीकडे मात्र शरद पवार यांच्यामुळे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार आल्याचा दावा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. बृजभूषण हे शेळी आहेत असेही संदीप देशपांडे म्हणाले. "वाघाला पकडण्यासाठी शेळी बांधली जाते तशी शरद पवार यांनी बृजभूषण नावाची शेळी बांधली आहे का याचा तपास आम्हाला करावा लागेल," अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे. त्यामुळे बृजभूषण यांच्या दौऱ्यावरुन मनसेतच मतभेद आहे का असा प्रश्न निर्माण झालाय.